अहिल्यानगर जिल्हाप्रवरा शिक्षण संस्थाराहाता तालुका

कर्मवीरांच्या विचारांची मशाल नव्या पिढीने पुढे न्यावी-डॉ. ज्ञानदेव म्हस्के

रयत संकुल लोणीत डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

प्रतिनिधी- शंकर सोनावणे 

 

लोणी- शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानून सर्वसामान्यांच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविणारे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त रयत संकुल, लोणी येथे जयंती सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहाची जाणीव करून देणारे मार्गदर्शन हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर विद्यापीठ, सातारा येथील कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर बाळासाहेब केरनाथ विखे पाटील, एकनाथराव घोगरे पाटील, उत्तमराव आहेर पाटील, जनार्दन घोगरे पाटील, सुधीरजी म्हस्के यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.प्राचार्य संदीप डहाळे यांनी प्रास्ताविकातून विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन गुरुकुल प्रमुख साहेबराव किरवे व दत्तात्रेय खैरे यांनी केले. ज्येष्ठ शिक्षक जालिंदर सिनारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

प्रमुख पाहुणे डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. आधुनिक काळात शिक्षणाच्या क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून त्यानुसार विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये आवश्यक कौशल्ये विकसित करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सचोटी, सातत्य, नियोजनबद्धता आणि आकलन क्षमता ही यशाची महत्त्वाची सूत्रे असून विद्यार्थ्यांनी बदलत्या आव्हानांकडे संधी म्हणून पाहावे, असा संदेश त्यांनी दिला.

 

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचा अधिकार समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उभी केलेली चळवळ आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत विद्यार्थ्यांनी ज्ञान, कर्तृत्व आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.कार्यक्रमात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभातून गौरव करण्यात आला. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!