अहिल्यानगर जिल्हा

गोदावरी नदीत पुन्हा पाणी सोडू नका;रब्बी हंगामासाठी धरणातील पाणीसाठा राखा अन्यथा आंदोलन छेडणार

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठी पाणी राखून ठेवण्याची विठ्ठलराव शेळके यांची मागणी

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – गोदावरी नदीत पुन्हा पाणी सोडण्यात येऊ नये, तसेच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठी धरणातील पाणीसाठा राखून ठेवण्यात यावा, अशी मागणी अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी गोदावरी कालवे पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. नदीत पुन्हा पाणी सोडल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मागील महिन्यात गोदावरी नदीत पाणी सोडून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पूर्णपणे भरून देण्यात आले आहेत. असे असतानाही काही शेतकरी पुन्हा नदीत पाणी सोडण्यासाठी आंदोलन करत आहेत. मात्र, नदीकाठच्या गावांमध्ये भूजल पातळीत वाढ झाली असली, तरी गोदावरी कालवे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे शेळके यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सुमारे शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने दुष्काळी नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने धरणाची उभारणी केली होती. यंदाही या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, लाभक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीसाठा संपला आहे. त्यामुळे शेतीसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

सध्या धरणात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून रब्बी हंगामात किमान दोन आवर्तने देता येऊ शकतात. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे. नदीत पुन्हा पाणी सोडण्याऐवजी रब्बी हंगामासाठी पाणीसाठा राखून ठेवावा, अशी मागणी शेळके यांनी केली आहे.

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची दुष्काळी परिस्थिती आणि शेतीसह जनावरांच्या चाऱ्याची गरज लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा. अन्यथा, शेतकरी संघटना आणि लाभक्षेत्रातील शेतकरी बंधू-भगिनींच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विठ्ठलराव शेळके यांनी दिला आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!