
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर : येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रवेशद्वारावर तरुण सभासदाला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे पुत्र सिद्धार्थ मुरकुटे यांच्याविरोधात श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी कारेगाव येथील सभासद अर्जुन सुभाष पटारे (वय २५) यांनी फिर्याद दिली आहे.
अर्जुन पटारे हे २६ सप्टेंबर रोजी अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले होते. त्यावेळी प्रवेशद्वारावर उपस्थित असलेल्या सिद्धार्थ मुरकुटे यांनी सभासद ओळखपत्र दाखवल्याशिवाय सभागृहात प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगितल्याचे पटारे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
त्यानंतर पटारे यांनी मोबाईलमध्ये आपले सभासद ओळखपत्र दाखविले. यावेळी सिद्धार्थ मुरकुटे यांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा आरोप पटारे यांनी केला आहे. या प्रकाराचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला असता मुरकुटे यांनी हातावर हात मारल्याने मोबाईल खाली पडला आणि त्याचे नुकसान झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच, यापूर्वीही शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अर्जुन पटारे यांनी केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी सिद्धार्थ मुरकुटे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुख्य हवालदार परदेशी करीत आहेत.



