(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी-क्रीडा क्षेत्रातील दमदार कामगिरीची परंपरा कायम राखत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या:प्रवरानगर येथील प्रवरा पब्लिक स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल संघाने पुणे विभागस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पुणे शहराच्या संघाचा ५-४ गोलने पराभव करत प्रवरेच्या युवा खेळाडूंनी आपल्या कौशल्याची, जिद्दीची आणि सांघिक एकजुटीची प्रभावी छाप उमटवली. आता या संघाची राज्यपातळीवर निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर येथे १४ व १९ वर्षांखालील मुलांच्या पुणे विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे क्रीडा संचालक रमेश दळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत पुणे विभागातील सात संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेदरम्यान प्रवरा पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी अचूक पासिंग, आक्रमक चाली, भक्कम बचाव आणि उत्कृष्ट गोलरक्षणाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांसमोर कडवे आव्हान उभे केले. अंतिम सामन्यातही खेळाडूंनी शेवटपर्यंत जिद्द कायम राखत ५-४ गोलने विजय मिळविला आणि विभागीय विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.
या यशामध्ये जयवर्धन माने-देशमुख, जतीन गायकवाड आणि ओमकार कांमडी या खेळाडूंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. खेळाडूंची मेहनत, शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना यांमुळे प्रवरा पब्लिक स्कूलच्या क्रीडा यशात आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे.शाळेचे प्राचार्य डॉ. बी. बी. अंबाडे, मुख्याध्यापिका सौ. एम. एस. जगधने आणि प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ. एस. आर. रत्नपारखी,शाळेचे क्रीडा संचालक अफजल पटेल, क्रीडा शिक्षक दीपक जाधव आणि फुटबॉल प्रशिक्षक अतुल डे यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे,शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, समन्वयक महेश खर्डे, क्रीडा संचालक रमेश दळे आणि डाॅ. उत्तम अनाप यांनी विजेत्या खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे व क्रीडा विभागाचे अभिनंदन केले.