(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी- पायरेन्स इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन, लोणी येथील एमबीएची विद्यार्थिनी कु. कीर्ती संभाजी गिते हिची अहिल्यानगर विभागाच्या आंतरविभागीय स्तरावरील व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे.या निवडीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला नवी प्रेरणा मिळाली असून, संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळणे महत्त्वाचे असते. अशा संधींचा लाभ घेत कीर्ती गिते हिने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर विभागीय संघात स्थान मिळविले आहे. तिच्या या यशामुळे महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या उपक्रमांना विशेष महत्त्व आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना विविध क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम महाविद्यालयाच्या माध्यमातून केले जाते. कीर्तीची विभागीय संघात झालेली निवड ही तिच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कीर्तीच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली असून, तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील संस्थेचे संचालक तथा सचिव डॉ. निलेश बनकर, आय बी एम ए चे संचालक डॉ मोहसीन तांबोळी आदींनी अभिनंदन केले आहे.