
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
शब्दांकन – शुभम भवर
आश्वी खुर्द – परिसरात यंदाचा गणेशोत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील गणेश मंडळांनी आपापल्या परीने भव्य दिव्य नियोजन करत उत्सवात रंगत वाढवली. विशेष म्हणजे नोकरीनिमित्त बाहेर शहरात असलेले अनेक तरुण कार्यकर्ते केवळ आपल्या मंडळासाठी सुट्टी घेऊन गावात दाखल झाले, तर महिला भगिनींचा प्रत्येक कार्यक्रमात मोठा सहभाग होता.
मंडळनिहाय उत्सवाचा आढावा –
१) विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ: भव्य मूर्ती आणि आगमन सोहळ्याने लक्ष वेधले. रोज संध्याकाळी मनोरंजन कार्यक्रमात महिलांचा मोठा सहभाग, गावातील वारकरी संप्रदायाच्या वतीने हरिपाठ, महाप्रसाद आणि भव्य विसर्जन मिरवणूक
२) मोरया हिंदू तरुण मित्र मंडळ: भव्य आगमन मिरवणूक, गावातील वारकरी संप्रदायाच्या वतीने हरिपाठ, महाप्रसादासोबतच सामाजिक बांधिलकी जपत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन, भव्य विसर्जन मिरवणूक 
३) अस्तित्व श्री गणेश तरुण मित्र मंडळ: आगमन मिरवणुकीनंतर विसर्जन दिवशी परिसरात प्रथमच दाखल झालेल्या छावा ढोल पथकाने सर्वांचे लक्ष वेधले
४) अष्टविनायक तरुण मित्र मंडळ: भव्य आगमन, रोज संध्याकाळी महिलांच्या सहभागाने मनोरंजन कार्यक्रम आणि पारंपरिक ढोल-ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणूक
५) चिंतामणी तरुण मित्र मंडळ: ज्ञानराज माऊली वारकरी गुरुकुल संस्थेच्या सहकार्याने टाळ-मृदंगाच्या जयघोषात बाप्पाचे स्वागत, रोज मनोरंजक कार्यक्रम, महाप्रसाद आणि विसर्जनात पारंपरिक संबळ वाद्य वाजवून बाप्पाला निरोप 
६) साती आसरा माता मित्र मंडळ: भव्य आगमन, महाप्रसाद आणि भव्य विसर्जन मिरवणूक काढून उत्सव साजरा
७) शिवतेज मित्र मंडळ: भव्य आगमन, महाप्रसाद आणि भव्य विसर्जन मिरवणूक काढून उत्सव साजरा
८) जय गणेश तरुण मित्र मंडळ: गावातील सर्वात लहान बाल मंडळ, हे मंडळ ४ वर्षांपासून कार्यरत असून लहानग्यांनी पारंपरिक पद्धतीने आगमन, महाप्रसाद आणि भव्य विसर्जन करून कौतुक मिळवले
एकंदरीत अनेक वर्षांची परंपरा जपण्याचे काम यंदाही सर्व मंडळांनी केले. विसर्जनाच्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते आणि मुखात एकच घोषणा होती – “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!”सर्व मंडळांचे कार्यकर्ते आता ४ सप्टेंबर २०२७ ची आतुरतेने वाट पाहत आहेत.दरम्यान, एक खंत – आश्वी खुर्दला नदीकाठी विसर्जनासाठी घाटच नाही, प्रशासनाने पक्का घाट बांधून द्यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.



