अहिल्यानगर जिल्हा

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत गोगलगावच्या मुलींची चमकदार कामगिरी!

खासदार बाळासाहेब विखे पाटील विद्यालयाचा संघ उपविजेता; तीन खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी- जिद्द, चिकाटी आणि सांघिक खेळाच्या जोरावर जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत खासदार बाळासाहेब विखे पाटील विद्यालय, गोगलगाव येथील १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. या संघाने सलग दुसऱ्या वर्षी जिल्हास्तरावर उपविजेतेपद मिळवून राहाता तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली. विशेष म्हणजे, संघातील कर्णधार आसावरी खाडे, आदिती देवकर आणि अस्मिता माघाडे या तीन खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या वतीने नेवासा येथील सेंट मेरीज स्कूलमध्ये जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गोगलगाव विद्यालयाच्या मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांना कडवी झुंज दिली.

 

तालुकास्तरीय स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक साधल्यानंतर जिल्हास्तरावर राहाता तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान या संघाने मिळविला.

राहुरी आणि नेवासा संघांवर मात

जिल्हास्तरीय स्पर्धेत राहाता संघाने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व सिद्ध केले. राहुरी संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात २५-१२ आणि २५-१४ अशा सलग दोन सेटमध्ये विजय मिळवत संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर बलाढ्य मानल्या जाणाऱ्या नेवासा संघाला २५-२३ आणि २५-२३ अशा गुणांनी पराभूत करत अंतिम फेरी गाठली. दोन्ही सामन्यांत खेळाडूंनी दाखवलेली एकाग्रता, अचूक चेंडूफेक आणि सांघिक समन्वय विशेष उल्लेखनीय ठरला.

अंतिम सामन्यात अटीतटीची लढत

गतवर्षीचा विजेता कोपरगाव आणि उपविजेता राहाता या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगला. अत्यंत चुरशीच्या या लढतीत दोन्ही संघांनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले.तीन खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

या संघात कर्णधार आसावरी खाडे, आदिती देवकर, अस्मिता माघाडे, श्रुती चौधरी, तनुजा खाडे, मनस्वी सातकर, अयोध्या मगर, श्रद्धा कांदळकर, स्वीकृती पडवळ, जयश्री सातपुते आणि आरोही मगर या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यापैकी कर्णधार आसावरी खाडे, आदिती देवकर आणि अस्मिता माघाडे यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.संघाला क्रीडाशिक्षक सुनील चोळके आणि प्रतिक गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

 

 या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिताताई विखे पाटील,सहसचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदू कुदळे यांच्यासह शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!