(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – जिल्ह्यात गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) कारवाई केली आहे. शेवगाव, पारनेर आणि पाथर्डी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार ठिकाणी छापे टाकून १ लाख ६२ हजार १६६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईप्रकरणी चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, काही संशयित फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली. या पथकांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी शेवगाव, पारनेर आणि पाथर्डी परिसरात कारवाई करत गुटखा, मावा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला.
शेवगावमध्ये १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव येथे पांडुरंग हरिश्चंद्र कातकडे (वय ३७) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणात मुजीब मुसा शेख हा फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या कारवाईत १४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पारनेरमध्ये दोन ठिकाणी कारवाई
पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. लोणी मावळा येथे विलास भागुजी शेंडकर (वय ४९) आणि समीर सत्तार शेख (वय ३८) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणात अर्जुन यादव हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत ५ हजार ३३६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत देवीभोयरे फाटा, वडझिरे येथे अशोक भाऊ निघुट (वय ३८) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणातही अर्जुन यादव हा फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या ठिकाणाहून २ हजार ३३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पाथर्डीत सर्वाधिक १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे शहादेव भानुदास जगताप (वय ५१) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणात नवनाथ भानुदास जगताप हा फरार असून, बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील मिलन ललवाणी याचाही प्रकरणात समावेश आहे. या कारवाईत १ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या चारही प्रकरणांत भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ तसेच लागू प्रकरणांत कलम ३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अवैध विक्रीविरोधात कारवाई सुरू
गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनांनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई केली.