
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – पावसाच्या मोठ्या खंडामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झालेल्या राहाता तालुक्यात दुष्काळी पंचनाम्यांच्या कामाला वेग आला आहे. तालुक्यातील ६१ गावांमध्ये ट्रिगर-१ लागू करण्यात आला असून, राहाता, लोणी, बाभळेश्वर, पुणतांबा, शिर्डी आणि अस्तगाव या सहा महसूल मंडळांमध्ये महसूल, कृषी आणि पंचायत समिती विभागाच्या संयुक्त पथकांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यात येत आहे.
राहाता तालुक्यात खरीप पिकांचे एकूण क्षेत्र ४९,७९९ हेक्टर आहे. पावसातील मोठ्या खंडामुळे सोयाबीन, मका, चारा तसेच अन्य खरीप पिकांसह फळबाग पिकांवर परिणाम झाला आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आगमीकाळात शासनाकडून मदत मिळण्यासाठी पंचनाम्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरत आहे.
४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत राहाता तालुक्यातील खरीपाचे दुष्काळी पंचनाम्यांचे काम जवळपास ५५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित पंचनामे पूर्ण करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत अहवाल पूर्ण करत आहे.
शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विवेक गुंड यांच्या समन्वयातून पंचनाम्याचे काम सुरू आहे. सहा महसूल मंडळांतील ६१ गावांमध्ये पंचनाम्यांसाठी महसूल, कृषी आणि पंचायत समिती विभागातील १०३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये महसूल सहाय्यक, ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.खरीपातील दुष्काळी पंचनाम्याच्या प्रक्रियेबाबत महसूल सहाय्यक, ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहाय्यकांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंचनाम्याचे काम शासनाच्या निर्देशानुसार आणि नियमाप्रमाणे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असून तालुक्यातील पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याकडे अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली.
पंचनाम्यासाठी ६१ गावांमधील शेतकऱ्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे फार्मर आयडी, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड उपलब्ध करून द्यावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच पंचनामा करताना शेत व पिकांचा जिओ-टॅग केलेला फोटो संबंधित अधिकाऱ्यांकडे जोडून देणे आवश्यक आहे. पंचनाम्याच्या प्रक्रियेत शेतकरी वर्गाकडूनही सहकार्य मिळत असून, अधिकारी व कर्मचारी शेतावर आल्यानंतर शेतकरी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत आहेत.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुट्टी न घेता पंचनाम्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे पालन केले जात असून, तालुक्यातील विविध गावांमध्ये अधिकारी व कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही उपस्थित राहून पंचनामे करत आहेत. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सहकार्याची भूमिका घेत पंचनाम्याचे काम वेगाने सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची योग्य नोंद पंचनाम्यात होऊन शासनाच्या निकषानुसार नुकसानभरपाईची रक्कम लवकरात लवकर मिळावी, यासाठी प्रशासनाकडून पंचनाम्याचे काम वेगाने सुरू आहे. संबंधित गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सदर अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर शासनाच्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची प्रक्रिया पुढे जाणार आहे.
तालुक्यातील ६१ गावांमध्ये दुष्काळी पंचनाम्याचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत जवळपास ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. महसूल, कृषी आणि पंचायत विभागातील अधिकारी-कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार शनिवार-रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशीही पंचनाम्याचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. उर्वरित पंचनामे पुढील तीन ते चार दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. संबंधित गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सदर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे पाठविण्यात येणार आहे.
— अमोल मोरे, तहसीलदार तथा अध्यक्ष, तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राहाता



