अहिल्यानगर जिल्हाराहाता तालुका

‘कोरडा दुष्काळ’मधून उलगडणार बळीराजाच्या वेदना; शेतकऱ्यांच्या संघर्षाचे वास्तव पडद्यावर

आबा निर्मळ, प्रमोद निर्मळ यांचा सामाजिक जाणिवेतून लघुपटाची निर्मिती

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

प्रतिनिधी – शंकर सोनवणे 

लोणी – दुष्काळ कर्जबाजारीपणा, सावकारी वसुली आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याच्या जीवनसंघर्षाचे वास्तववादी चित्रण करणारी एनपी व्हिजन फिल्म्स निर्मित ‘कोरडा दुष्काळ’ ही मराठी लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्माते आबा निर्मळ आणि दिग्दर्शक प्रमोद निर्मळ यांनी या लघुपटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

शेतात पाऊस पडला नाही की केवळ पिकांचे नुकसान होत नाही, तर शेतकरी कुटुंबाच्या स्वप्नांवरही पाणी फिरते. मुलांचे शिक्षण, मुलीच्या संसाराची चिंता, कर्जाची परतफेड आणि घरखर्चाची ओढाताण अशा अनेक समस्यांना शेतकऱ्याला सामोरे जावे लागते. या संघर्षाचे भावनिक आणि वास्तववादी चित्रण ‘कोरडा दुष्काळ’ या लघुपटातून मांडण्यात आले आहे. संकटांनी घेरलेल्या शेतकरी कुटुंबाच्या आयुष्यात पुढे काय घडते, याची उत्कंठा कथानकातून कायम ठेवण्यात आली आहे.

आबा निर्मळ यांनी या लघुपटाची कथा व पटकथा लिहिली असून, प्रमोद निर्मळ यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. या निर्मितीसाठी पप्पू लोणारी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. लघुपटात मनीषा गुळवे, ज्ञानेश्वर थोटे, बिराजी घोगरे, प्रमोद निर्मळ, पप्पू लोणारी, मीनाताई निर्मळ, आबा निर्मळ, अमृता आकाश धुमाळ आणि आकाश माणिक धुमाळ हे कलाकार विविध भूमिका साकारत आहेत.

शेतकरी प्रश्नांवर सामाजिक भाष्य

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न, कर्जबाजारीपणा आणि ग्रामीण कुटुंबांची आर्थिक ओढाताण यांकडे समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या लघुपटातून करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून न पाहता, संकटाच्या काळात त्यांना प्रत्यक्ष आधार देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

मनोरंजनासोबतच सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या ‘कोरडा दुष्काळ’ या लघुपटाच्या माध्यमातून आबा निर्मळ आणि प्रमोद निर्मळ यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे वास्तव, त्यांच्या वेदना आणि कुटुंबाच्या भवितव्यासाठी सुरू असलेली धडपड पडद्यावर मांडण्याचा त्यांचा हा प्रयत्न शेतकरी प्रश्नांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणारा ठरण्याची अपेक्षा आहे. लघुपटाच्या माध्यमातून बळीराजाच्या वेदना आणि त्याच्या जगण्याचा संघर्ष प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!