अहिल्यानगर जिल्हाराहाता तालुका

“गुंड संपवण्यासाठी गुंडच लागतो आणि तो गुंड मी आहे”; सुजय विखे पाटील यांचा इशारा

शिर्डी विधानसभा मतदारसंघासह राहाता तालुका गुन्हेगारीमुक्त करण्याचा निर्धार; गुन्हेगारीविरोधातील कारवाई सुरूच ठेवणार

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – “गुंड संपवण्यासाठी गुंडच लागतो आणि तो गुंड मी आहे. हे मी आवर्जून सांगतो,” अशा थेट शब्दांत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी गुन्हेगारीविरोधात आक्रमक भूमिका मांडली. शिर्डी विधानसभा मतदारसंघासह राहाता तालुका पूर्णपणे गुन्हेगारीमुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राहाता येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी गुन्हेगारीविरोधातील कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

“मला कोणासोबत सोयरीक करायची नाही. कोणी काहीही बोलले तरी मला फरक पडत नाही. समाजासाठी निर्णय घेणे आवश्यक आहे,” असे सांगत त्यांनी गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेतली. गुन्हेगारी संपवण्यासाठी आवश्यक निर्णय घेताना कोणाचीही पर्वा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मतदारसंघात कोणी तलवार घेऊन फिरत असेल, तर कोणी कट्टा घेऊन फिरत असल्याच्या तक्रारी नागरिक आपल्याकडे करतात. “दादा, काहीतरी करा,” असे सांगणारे अनेक जण आहेत. मात्र, त्याच वेळी कोणालाही आपले नाव पुढे यायला नको असते. कोणालाही आपले कपडे घाण करायचे नाहीत; पण गुन्हेगारीची घाण साफ करायची आहे. स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवायची आणि कारवाईची जबाबदारी दुसऱ्याने घ्यावी, अशी भूमिका योग्य नसल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

मला कोणाचीही पर्वा नाही. गुन्हेगारीविरोधात कारवाई सुरूच राहणार. गुंड संपवण्यासाठी गुंडच लागतो आणि तो एकटा गुंड मी आहे,” असे ठामपणे सांगत गुन्हेगारीविरोधातील लढाईत मागे हटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिर्डी विधानसभा मतदारसंघ आणि राहाता तालुका गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असेही त्यांनी नमूद केले.

शिर्डीतील विकासाच्या मुद्द्यावर बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांच्या आरोपांवर भाष्य केले. “शिर्डी आम्ही स्वच्छ केली आहे. त्यामुळे कोण काय बोलते, कोण काय आरोप करते, याकडे लक्ष देण्याची गरज नाही,” असे ते म्हणाले. शिर्डीच्या विकासाची जबाबदारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर असून, शहराचा विकास आणि नागरिकांचे हित हेच प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

शिर्डीत एखाद्या गरीब व्यक्तीवर अन्याय किंवा अत्याचार होत असेल, तर संबंधित व्यक्ती कोण आहे, याचा विचार केला जाणार नाही. तो नगरसेवक असो, सरपंच असो किंवा आपल्या जवळचा असो, अन्याय करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, असे स्पष्ट करत नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, सामान्य माणसावर अन्याय होऊ नये आणि शिर्डीचा विकास वेगाने व्हावा, यासाठी कटिबद्ध असल्याचा संदेश डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेला आहे.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!