अहिल्यानगर जिल्हाराहाता तालुका

महिला बचत गटांना स्वयंरोजगाराची नवी संधी; बाभळेश्वर येथे सुगंधित मेणबत्ती व सुक्या फुलांपासून दागिने निर्मिती प्रशिक्षण

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

लोणी-ग्रामीण भागातील महिला बचत गटांना स्वयंरोजगाराची नवी दिशा मिळावी, महिलांच्या कौशल्यांना व्यावसायिक स्वरूप प्राप्त व्हावे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता यावे, या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर व केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था (CIMAP), लखनऊ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ व २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सुगंधित मेणबत्ती व सुक्या फुलांपासून दागिने निर्मिती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. उत्तमराव कदम, पायरेन्सचे सचिव तथा संचालक डॉ. निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणात महिलांना सुगंधित मेणबत्त्या तयार करण्याचे तंत्र, त्यासाठी लागणारा कच्चा माल, सुगंधांची निवड आणि आकर्षक स्वरूपातील मेणबत्त्यांची निर्मिती याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच सुक्या फुलांचा कलात्मक वापर करून विविध प्रकारचे आकर्षक दागिने तयार करण्याचे तंत्र प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह शिकविले जाणार आहे.

 

नैसर्गिक साधनसामग्रीचा कल्पक वापर करून मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे, उत्पादनांचा दर्जा टिकविणे, आकर्षक पॅकेजिंग करणे आणि तयार वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठेच्या संधी शोधणे, यावर प्रशिक्षणात विशेष भर देण्यात येणार आहे. कमी प्रमाणात भांडवल उपलब्ध असतानाही घरातून लघुउद्योग सुरू करण्यासाठी अशा प्रशिक्षणाचा महिलांना उपयोग होऊ शकतो. तयार उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळाल्यास बचत गटांच्या उत्पन्नवाढीलाही हातभार लागू शकतो.

महिला सक्षमीकरणासोबतच ग्रामीण भागात लघुउद्योग आणि उद्योजकतेला चालना देणारा हा उपक्रम ठरणार आहे.त्यामुळे परिसरातील महिला बचत गटांच्या सदस्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी केले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!