अहिल्यानगर जिल्हा

‘१२ जणांनी घेतलेले २८०० कोटींचे कर्ज भरा आणि जिल्हा बँक बिनविरोध करा!’; खासदार निलेश लंके यांचा बड्या कर्जदारांवर आरोप

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

 

अहिल्यानगर – अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना, खासदार निलेश लंके यांनी बँकेच्या बिनविरोध प्रक्रियेवरून आक्रमक भूमिका मांडली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना, शेतकऱ्यांची कामधेनू असलेली ही संस्था वाचवण्यासाठी निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे; मात्र बँकेचे तब्बल २८०० कोटी रुपयांचे कर्ज बड्या कर्जदारांकडे थकीत असल्याचा दावा करत, आधी ही थकबाकी वसूल करा आणि मगच बिनविरोध करा, असा मुद्दा खासदार लंके यांनी उपस्थित केला.

माध्यमांशी संवाद साधताना खासदार निलेश लंके म्हणाले की, आपण संचालक मंडळावर असो अथवा नसो, शेतकऱ्यांची ही हक्काची संस्था कोणत्याही वादाशिवाय सुरळीत चालली पाहिजे. जिल्हा बँकेवर आज चार ते साडेचार हजार कोटी रुपयांचे एकूण कर्ज थकीत असल्याचे सांगताना, त्यातील सुमारे २८०० कोटी रुपयांचे कर्ज केवळ १० ते १२ बड्या कारखानदार व नेत्यांनीच उचलले असल्याचा दावा त्यांनी केला.

“या १२ जणांकडून आधी २८०० कोटी रुपयांची थकीत कर्जाची रक्कम बँकेत भरून घ्यावी आणि त्यानंतरच ही निवडणूक बिनविरोध करून टाकावी,” असे खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांची बँक वाचवण्यासाठी सर्वपक्षीय पातळीवर निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार लंके यांनी थेट बड्या कर्जदारांच्या वसुलीचा मुद्दा उपस्थित केला आहे. सर्वसामान्यांच्या ठेवी असलेल्या या बँकेत मोठ्या प्रमाणात कर्जाची रक्कम थकीत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. बिनविरोध निवडणुकीला आपला विरोध नसल्याचे लंके यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, सर्वांना विश्वासात घेऊन आणि कोणालाही डावलले जाणार नाही, अशा पद्धतीने प्रक्रिया झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

बँकेच्या निवडणुकीसोबतच थकीत कर्जाचा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे. बड्या कर्जदारांकडील थकीत रक्कम वसूल करण्याचा मुद्दा पुढे करून लंके यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या चर्चेत कर्जवसुलीचा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

 

“मी आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येताना परमेश्वराकडे मनोमन हीच प्रार्थना केली की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. आपण संचालक मंडळावर असो अथवा नसो, पण शेतकऱ्यांची ही हक्काची संस्था कोणत्याही वादाशिवाय सुरळीत चालली पाहिजे. मात्र, १० ते १२ बड्या कारखानदार व नेत्यांनी घेतलेले २८०० कोटी रुपयांचे थकीत कर्ज आधी बँकेत भरून घ्यावे आणि त्यानंतरच निवडणूक बिनविरोध करावी.”— खासदार निलेश लंके

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!