
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
मुंबई – संपूर्ण देशात असंतोष असून भाजप सत्तेसाठी काहीही करेल. निवडणूक आयोग हा आपला गुलाम असला पाहिजे, त्या दृष्टीने भाजपने पाऊल उचलले,” असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी तसेच निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात मुंबईत काढण्यात आलेल्या ‘गर्जना मोर्चा’दरम्यान थोरात बोलत होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत हा मोर्चा काढण्यात आला. मेट्रो सिनेमा येथून सुरू झालेला मोर्चा मुंबई महानगरपालिका मुख्यालयाकडे रवाना झाला. काँग्रेससह महाविकास आघाडीतील विविध नेते आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले.
मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (एसआयआर) विरोध, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणे हे मोर्चाचे प्रमुख मुद्दे होते. महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आणि मतदान प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवरही जोरदार टीका केली. “ज्ञानेश कुमार हे भ्रष्ट कारभाराचे प्रतीक आहेत. २०१४ पासूनचा कालखंड हा देशाच्या इतिहासात काळा कालखंड म्हणून ओळखला जाईल,” असे थोरात म्हणाले.मतचोरीतून भाजपने विजय मिळवला. आपली आजची ही गर्जना देशात जाणार आहे,” असेही थोरात यांनी सांगितले. लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी जनतेने एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
मोर्चात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह विविध पक्षांचे नेते सहभागी झाले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक तिरंगा घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.



