(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी-तांत्रिक ज्ञान, अचूक विचारशक्ती आणि प्रसंगावधान यांचा कस पाहणाऱ्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावत मानाचा किताब मिळविला. शुभम नरोडे आणि यशराज गुमास्ते या विद्यार्थ्यांनी १५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळवत यजमान संस्थेच्या यशाची परंपरा कायम राखली. नाशिक आणि चांदवड येथील विद्यार्थ्यांनीही अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक), लोणी येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या प्रायोजकत्वाखाली ५ ऑक्टोबर २०२६ रोजी या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यांत्रिकी अभियांत्रिकीच्या पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत विविध तंत्रनिकेतनांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
लोणीच्या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक
स्पर्धेत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पॉलिटेक्निक, लोणी येथील शुभम बाळासाहेब नरोडे आणि यशराज समीर गुमास्ते यांनी प्रथम क्रमांक मिळवत १५ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. संदीप पॉलिटेक्निक, नाशिक येथील शाहिद अन्सारी आणि मंथन संदीप दळवी यांनी द्वितीय क्रमांकासह १० हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. तर एस. एच. एच. जे. बी. पॉलिटेक्निक कॉलेज, चांदवड येथील रोहित संदीप मोरे आणि अध्ययन रवींद्र चव्हाण यांनी तृतीय क्रमांक मिळवत पाच हजार रुपयांच्या पारितोषिकावर आपले नाव कोरले.
अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पना तसेच आधुनिक तंत्रज्ञानातील प्रगतीवर आधारित प्रश्न विचारण्यात आले. विविध फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान, विश्लेषण क्षमता, प्रसंगावधान आणि निर्णयक्षमता यांची कसून चाचणी घेण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर आपले तांत्रिक कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली.
यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख आर. के. बेलकर, समन्वयक व्ही. आर. लवांडे, सहसमन्वयक एस. डी. शेळके तसेच आयोजन समितीतील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी स्पर्धेच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ आणि प्राचार्य डॉ. व्ही. आर. राठी आदींनी अभिनंदन केले आहे.