(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रीम मदत देण्याची घोषणा केली आहे. राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पाच हजार रुपयांची मदत पुरेशी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असून, शेतकरी संघटनांकडून अधिक आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.
पाच हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची?
राज्यातील अनेक भागांत पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचे उत्पादन घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतीसाठी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी असताना घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि दिवाळीचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली मदत नुकसानीच्या तुलनेत अपुरी असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
२५ हजार रुपये बोनस देण्याची मागणी
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी तथा शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ जोगळे यांनी सरकारच्या मदतीवर नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना दिवाळीसाठी किमान २५ हजार रुपये बोनस द्यावा, कापसाला प्रतिक्विंटल १२ हजार रुपये आणि सोयाबीनला प्रतिक्विंटल आठ हजार रुपये भाव मिळावा, तसेच सरसकट कर्जमाफी करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. केवळ पाच हजार रुपयांची मदत देण्याऐवजी शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन ठोस आर्थिक मदत द्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
३०५ तालुक्यांत दुष्काळ; सरकारकडून मदतीची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या २६५ वरून ३०५ केल्याची माहिती दिली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये अग्रीम मदत देण्यात येणार आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागांसाठी विविध सवलती लागू राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.