(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
प्रवरानगर – पत्रकारांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश यांच्या पुढाकारातून ‘पत्रकार नागरिक सहकारी मल्टीस्टेट बँक’ स्थापन करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची मुहूर्तमेढ मराठवाड्यातून रोवण्यात आली असून, देशातील सर्वच पत्रकारांच्या हितासाठी उभारण्यात येणारी ही अभिनव बँक असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले.
पत्रकारांच्या हितासाठी उभारण्यात येणाऱ्या या बँकेमुळे पत्रकारांना आर्थिक स्थैर्याचा नवा आधार मिळणार आहे. बँकेच्या माध्यमातून पत्रकारांना कमी व्याजदरात कर्ज, विमा सुविधा, बचत योजना तसेच आपत्कालीन आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः ग्रामीण आणि तालुका पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना या उपक्रमाचा मोठा फायदा होणार असल्याचा दावा परिषदेकडून करण्यात आला आहे.
मराठवाड्यातून सुरू झालेल्या सभासद नोंदणी मोहिमेला पत्रकारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आगामी काळात महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांमध्येही बँकेचा विस्तार करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे , केंद्रीय संचालक राजकुमार बिर्ला , डॉ. अनिल सिरसाट, केंद्रीय संचालक संदीप महाजन, राज्य उपाध्यक्ष प्रविण (पप्पू) शिंदे, राज्य संपर्कप्रमुख डॉ. बालाजी पेनूरकर, मराठवाडा कार्याध्यक्ष शुद्धोधन हनवते, मराठवाडा सचिव प्रदीपकुमार जैन, नांदेड जिल्हाध्यक्ष देवांद गुंडेकर, सदाशिव पतंगे, मराठवाडा कार्याध्यक्ष महिला मंच सौ. सुनीता वेरूळकर, नांदेड शहर अध्यक्ष सौ. चंदा शर्मा, परभणी जिल्हा प्रमुख शुभम लोखंडे, अहमदपूर तालुका प्रमुख रामराव रत्नपारखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मधुसूदन कुलथे यांनी पत्रकारांच्या आर्थिक सुरक्षिततेवर भर देताना सांगितले की, देशात प्रथमच केवळ पत्रकारांच्या हितासाठी अशा स्वरूपाची बँक उभारली जात आहे.जागतिक दर्जाचे पत्रकार ते ग्रामीण पातळीवरील पत्रकारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँक महत्त्वाची भूमिका बजावेल.
पत्रकारांना आर्थिक गरजा भागविण्यासोबतच भविष्यातील सुरक्षितता आणि सामाजिक स्थैर्य मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बँकेला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक असून, लवकरच महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही बँकेचा विस्तार केला जाणार असल्याचे माहिती अहिल्यानगर राज्य मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष शहाजी यांनी दिली
पत्रकारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने देशातील पहिल्या पत्रकारांच्या बँकेची शाखा राज्य मराठी पत्रकार परिषदचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली असून, पत्रकारांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यावर भर राहणार असल्याचे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातही राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या ‘पत्रकार नागरिक सहकारी मल्टीस्टेट बँकेची लवकरच सुरु करण्यात येईल राज्य मराठी पत्रकार परिषदचे जिल्हाध्यक्ष शहाजी दिघे यांनी सांगितले.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार समाजात काम करत असताना त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सबळ बनविण्याच्या उद्देशाने देशातील पहिली पत्रकारांची बँक महाराष्ट्रातून सुरू होत आहे. या बँकेचे जाळे भविष्यात संपूर्ण देशभर विस्तारले जाईल, अशी माहिती राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी दिली.पत्रकारांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन उभारण्यात येणाऱ्या या बँकेच्या माध्यमातून पत्रकारांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यावर भर राहणार आहे. विशेषतः ग्रामीण आणि तालुका पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.