
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
नेवासा – सुरेशनगर (ता. नेवासे) येथील ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडे करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यासाठी धमकी देत सामाजिक कार्यकर्त्यावर मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. “तक्रार मागे घेतली नाही तर जीवे ठार मारून टाकू,” अशी उघड धमकी देण्यात आल्याचा आरोप असून या प्रकरणी नेवासे पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत ग्रामपंचायत शिपाई सखाराम उर्फ अविनाश बाबासाहेब उभेदळ, विमलबाई बाबासाहेब उभेदळ, बाबासाहेब कोंडीराम उभेदळ व सारिका सखाराम उर्फ अविनाश उभेदळ यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते अमृत सुरेश उभेदळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवार (दि. 13) रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोर हा प्रकार घडला.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, त्यांच्या घरासमोरील नव्याने लावलेल्या नारळाच्या झाडांची पाने शेजारी राहणाऱ्या विमलबाई उभेदळ यांच्या शेळ्या खात होत्या. त्या वेळी घरासमोर रसवंती व्यवसाय करणारे संदीप भास्कर कणगरे यांनी संबंधितांना समजावून सांगितले असता त्यांच्याशी शिवीगाळ करण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच संदीप कणगरे यांनी अमृत उभेदळ यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली.
अमृत उभेदळ घरी पोहोचले असता त्यांच्या घरासमोर विमलबाई उभेदळ, त्यांचा मुलगा ग्रामपंचायत शिपाई सखाराम उर्फ अविनाश उभेदळ, पती बाबासाहेब कोंडीराम उभेदळ आणि सुन सारिका उभेदळ हे सर्व उपस्थित होते. अमृत उभेदळ यांनी शेळ्या घराच्या प्रांगणामध्ये येऊ देऊ नयेत तसेच शिवीगाळ करू नये असे समजावून सांगितले असता, संबंधित चौघांनी अर्वाच्च शिवीगाळ करत वाद वाढविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीनुसार, ग्रामपंचायत शिपाई सखाराम उर्फ अविनाश उभेदळ यांनी “तू माझ्या व सरपंच शैला कल्याण उभेदळ यांच्या विरोधात ग्रामपंचायतीतील खालेल्या पैशांबाबत अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडे केलेली तक्रार मागे घेतली नाही तर तुला ठार मारून टाकू,” अशी धमकी दिली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर नेवासे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, 2023 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक अनियमिततेबाबत तक्रार केल्यानंतर तक्रारदारालाच धमक्या व मारहाण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.




