
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यातील निर्मळ पिंपरी शिवारात निर्जन ठिकाणी गुपचूप सुरू असलेल्या गर्भलिंग तपासणीच्या प्रकाराचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. छाप्यामध्ये एका डॉक्टरसह एजंटला ताब्यात घेण्यात आले असून, तपासणीसाठी आलेल्या महिलांनाही सुरक्षित ताब्यात घेतले आहे.
लोणी–निर्मळ पिंपरी मार्गालगत निळवंडे कालव्याच्या कडेला, शेतातील दोन खोल्यांमध्ये हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यानुसार तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आले. श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ठिकाणी छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला.कारवाईदरम्यान पोलिसांना सोनोग्राफी (अल्ट्रासाऊंड) मशीन, मॉनिटर, बॅटरीवर चालणारी वीजयंत्रणा, जेल, तसेच वैद्यकीय कागदपत्रे आणि इतर उपकरणे आढळून आली. ही सर्व सामग्री जप्त करण्यात आली आहे.
घटनास्थळी उपस्थित डॉक्टर, एजंट आणि इतर संबंधितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीयतेने पार पाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणामागील इतर संबंधितांचा शोध सुरू असून, संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.




