(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – यावर्षी प्रचंड दुष्काळी परिस्थिती असली, तरी धरण समूहातील सर्व धरणांमध्ये चांगला पाणीसाठा असल्याने गोदावरी कालव्यांद्वारे रब्बी हंगामात दोन आणि उन्हाळी हंगामात दोन, अशी एकूण चार आवर्तने द्यावीत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी केली. यासंदर्भात त्यांनी जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना लेखी निवेदन दिले.
राहाता येथील कुंदन लॉन्स येथे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी शेतकरी प्रतिनिधी म्हणून विठ्ठलराव शेळके यांनी लाभक्षेत्रातील ओढे-नाले खोदावेत, मागील पाणीपट्टी माफ करावी तसेच शेतीतील उभी पिके, फळबागा व ऊस पिकांना पाणी द्यावे, अशा मागण्या मांडल्या.
यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी रब्बी हंगामातील आवर्तनांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार पहिले आवर्तन १ डिसेंबर ते १ जानेवारी आणि दुसरे आवर्तन १ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बिगर सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी ऑगस्टपर्यंत पाणी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
या बैठकीस आमदार हेमंत ओगले, आमदार आशुतोष काळे, मा. आ. स्नेहलताताई कोल्हे, जलसंपदा व पाटबंधारे विभागातील अधिकारी, उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड,लाभक्षेत्रातील मान्यवर शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.बैठकीच्या समारोपप्रसंगी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कालव्यांचे रुंदीकरण, चाऱ्यांचे खोदकाम तसेच ओढे-नाल्यांची कामे केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडून आभार मानले.