अहिल्यानगर जिल्हा

ऊसदरासह शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ९ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्या पालकमंत्री विखे पाटील यांचे साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांना निर्देश

वजनकाट्यांची तपासणी होणार, तक्रार निवारण केंद्र स्थापन करणार

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसदरासह विविध मागण्यांबाबत येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. यासाठी सर्व साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांनी स्वतंत्र बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कारखान्यांतील वजनकाट्यांची संयुक्त पथकामार्फत तपासणी आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी स्वतंत्र केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यानगर जिल्ह्यातील सन २०२६-२७ च्या गळीत हंगामातील ऊसदर आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकरी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींकडून विविध समस्या व मागण्या जाणून घेण्यात आल्या.

ऊसदर आणि शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांबाबत कारखाना व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घ्यावी. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या संचालक मंडळांनी स्वतंत्र बैठक घेऊन या प्रश्नांवर चर्चा करावी आणि ९ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यांतील वजनकाट्यांच्या अचूकतेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेत प्रशासनामार्फत वजनकाट्यांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी तहसीलदार आणि वैधमापनशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक नियुक्त केले जाणार आहे. या तपासणीवेळी शेतकरी अथवा शेतकरी संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार असल्याने वजन प्रक्रियेत पारदर्शकता राहण्यास मदत होणार आहे.

गळीत हंगामादरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि तक्रारींचे तातडीने निराकरण व्हावे, यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या केंद्रामार्फत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राधान्याने हाताळून त्यावर योग्य तोडगा काढण्यात येणार आहे.

ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यात समन्वय राखून प्रश्न सोडविण्याची शासनाची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांचा सकारात्मक विचार करून सर्व संबंधित घटकांच्या सहकार्याने मार्ग काढण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपमहापौर धनंजय जाधव, प्रादेशिक उपसंचालक (साखर) संजय गोंदे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!