गुन्हेगारीमहाराष्ट्र

अहिल्यानगर एमआयडीसीत उद्योगसंस्थेकडून जबरदस्तीने खंडणी उकळल्याप्रकरणी कामगार सेनेचा पदाधिकारी अटकेत

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – अहिल्यानगर एमआयडीसी परिसरातील एका उद्योगसंस्थेकडून जबरदस्तीने खंडणी उकळल्याप्रकरणी अखिल भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यास अटक करण्यात आली आहे.

 

दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास निंबळक एमआयडीसी येथील प्लॉट क्रमांक ०७ व ०८ वरील सुयश मेटल प्रोसेसिंग्स प्रा. लि. या कंपनीत काही इसमांनी बेकायदेशीर प्रवेश केला. भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे, राजेश पाटील व अन्य चार अनोळखी इसमांनी कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश जनार्दन कोकाटे यांना शिवीगाळ व दमदाटी करून काम बंद पाडले. काम सुरू ठेवायचे असल्यास दरमहा एक लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा जीव घेण्याची धमकी देण्यात आली. त्यावेळी व्यवस्थापकांकडून जबरदस्तीने २० हजार रुपये रोख रक्कम घेतल्याचा आरोप आहे. तसेच संबंधित कामगार संघटनेला मान्यता देण्यासाठी कामगारांना चिथावणी देण्यात आल्याचेही समोर आले आहे.

 

घटनेनंतर कंपनीच्या उद्योजकांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन तक्रार दिली. त्यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ११८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुख्य आरोपी भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उनवणे (रा. एमआयडीसी, अहिल्यानगर) यास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू आहे.

 

दरम्यान, आरोपीविरुद्ध यापूर्वीही तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यांत खून, खुनाचा प्रयत्न, दंगल, शासकीय कामात अडथळा अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी परिसरातील उद्योजक व कामगारांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून उद्योजकांना संरक्षण देण्याबाबत पोलिसांनी भूमिका व्यक्त केली आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!