
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत मंजूर घरकुलांच्या अनुदान वितरण प्रक्रियेत काही तांत्रिक कारणांमुळे विलंब होत असल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. घरकुलासाठी पहिला, दुसरा व तिसरा हप्ता वेळेत न मिळाल्यामुळे काही लाभार्थ्यांना कर्ज काढून किंवा उसनवारी करून घरकुलांचे बांधकाम सुरू ठेवण्याची वेळ आली आहे.मात्र प्रशासनाकडून अनुदान वितरण प्रक्रियेत अधिक वेग आणि पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. संपूर्ण जिल्ह्यात तांत्रिक कारणांमुळे हप्ते जमा होण्यास विलंब होत असला तरी ‘स्पर्श’ प्रणालीअंतर्गत एसएनए अद्ययावत करण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती पंचायत समितीकडून देण्यात आली आहे.
“स्पर्श” प्रणाली ही शासनाकडून अनुदान व लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी वापरली जाणारी डिजिटल पडताळणी व वितरण यंत्रणा आहे. सध्या शासनाकडून या प्रणालीचे तांत्रिक अद्ययावतीकरण सुरू असून, या प्रणालीद्वारे भविष्यात अवघ्या चार तासांच्या आत अनुदानाचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग होईल,असा दावा राहाता तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विवेक गुंड यांनी केला आहे.
सन २०२५–२६ या कालावधीत राहाता तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींमध्ये एकूण ६,३८९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ४६० घरकुले पूर्ण झाली असून १,७२६ घरकुले चौकट स्तरावर आहेत, तर ९२० घरकुलांचा पाया पूर्ण झाला आहे. एकूण ३,१०६ घरकुलांचे बांधकाम विविध टप्प्यांवर सुरू आहे. तसेच ३,२८३ घरकुलांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला असून त्यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. ही आकडेवारी एकूण मंजूर घरकुलांपैकी विविध टप्प्यांवरील प्रगती दर्शवते.
दरम्यान, ग्रामपंचायतींकडून घरकुलाची जागा निश्चित झाल्यानंतर जागेची पाहणी केली जाते. त्यानंतर पहिला हप्ता अदा करण्यात येतो. पुढील टप्प्यांवर बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून घरकुलांचे फोटो जिओटॅगद्वारे ‘आवास’ अॅपवर अपलोड केले जातात. त्यानंतर साधारण आठवडाभरात लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग होणे अपेक्षित असते. मात्र जिल्ह्यासह राहाता तालुक्यात काही प्रकरणांमध्ये अनुदान वितरणास एक ते दीड महिना कालावधी लागल्याचे निदर्शनास आले आहे. सुधारित प्रणालीमुळे हा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागातील घरकुलासाठी मिळणारे अनुदान…
ग्रामीण भागात घरकुलासाठी १,२०,००० रुपये अनुदान दिले जाते. घरकुलाचे बांधकाम सुरू होण्यापूर्वी १५,००० रुपये, पाया किंवा बांधकाम सुरू झाल्यावर ७०,००० रुपये, भिंती व छप्पर स्तर पूर्ण झाल्यावर ३०,००० रुपये आणि पूर्ण बांधकामानंतर ५,००० रुपये असा अंतिम हप्ता दिला जातो.तसेच बांधकाम मजुरांची ९० दिवसांच्या हजेरीनुसार (९० × ३१२ रुपये) २८,०८० रुपये मजुरी दिली जाते. त्यामुळे घरकुल व मजुरी मिळून एकूण १,४८,०८० रुपये लाभ मिळतो.यासोबत शौचालयासाठी स्वतंत्र १२,००० रुपये दिले जातात. त्यामुळे घरकुल + मजुरी + शौचालय असा एकूण लाभ १,६०,०८० रुपये होतो. तसेच १ किलोवॅट सौर पॅनलसाठी प्रधानमंत्री सूर्य घर योजना अंतर्गत ३०,००० रुपये आणि आवास योजनेतून अतिरिक्त १५,००० रुपये अनुदान दिले जाते. सौर अनुदानासह एकूण कमाल लाभ २,०५,०८० रुपये इतका मिळू शकतो.




