प्रशासकीयमहाराष्ट्र

जळगाव ग्रामपंचायतीच्या गट क्रमांक २२३ मधील मोजणी मोहिमेकडे नागरिकांचे लक्ष; अतिक्रमणांवर निष्पक्ष कारवाई होणार की पुन्हा पाठबळ मिळणार?

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

जळगाव – जळगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण क्षेत्रातील गट क्रमांक २२३ मध्ये राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विवेक गुंड यांच्या आदेशानुसार तसेच उपअभियंता, महाभूमी अभिलेख विभाग, राहाता यांच्या माध्यमातून अधिकृत मोजणी करण्यात येणार आहे. या प्रक्रियेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून, मोजणीदरम्यान अतिक्रमणे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कोणताही दुजाभाव न करता नियमांनुसार कारवाई होणार का, की पुन्हा एकदा अतिक्रमणधारकांना पाठबळ मिळणार, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

जळगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अनेक वर्षांपासून गावठाण हद्दीतील विविध ठिकाणी अतिक्रमणे झाल्याची चर्चा गावात आहे. अनेक वेळा तक्रारी होऊनही अशा प्रकरणांवर ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, ही अतिक्रमणे आणि नियमबाह्य बांधकामे प्रशासनाच्या नजरेस पडत असतानाही त्यावर कारवाई करण्याऐवजी काही प्रकरणांत ग्रामपंचायतीकडूनच नियमबाह्य पद्धतीने बांधकामांना परवानगी देण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

विशेष म्हणजे, सर्वसामान्य नागरिकाला घरकुलाचा लाभ मिळवण्यासाठी अनेक निकषांची पूर्तता करावी लागते. जागेची वारंवार पाहणी, कागदपत्रांची छाननी, विविध प्रशासकीय पडताळण्या आणि मंजुरीसाठीची दीर्घ प्रक्रिया यामुळे लाभार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा घरकुलाची मंजुरी मिळवताना नागरिकांना अक्षरशःत्रास सहन करावा लागतो.मात्र, याउलट ग्रामपंचायत मालकीच्या जागांवर अथवा अतिक्रमित क्षेत्रात उभारण्यात आलेल्या काही बांधकामांच्या बाबतीत असे निकष कितपत पाळले गेले, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

अतिक्रमित जागांवर बांधकामे सुरू असतानाच त्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी माहिती देण्यात आली होती. काही प्रकरणांमध्ये लेखी व तोंडी तक्रारीही करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, यानंतरही संबंधित बांधकामे सुरूच राहिली. बांधकामे अर्ध्याहून अधिक पूर्णत्वास जाईपर्यंत प्रभावी कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

अनेक अतिक्रमित जागांवरील बांधकामे ५० टक्क्यांहून अधिक पूर्णत्वास गेली असतानाही प्रशासनाकडून केवळ नोटिसा बजावण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही. नोटिसा दिल्यानंतरही बांधकामे सुरूच राहिल्याने त्या नोटिसांचा प्रत्यक्षात किती प्रभाव आहे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

स्थानिक पातळीवर वारंवार तक्रारी करूनही त्यांचे निराकरण होत नसल्याने अखेर पंचायत समिती प्रशासनाला जळगाव ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणांचा प्रश्न हाताळण्याची वेळ आली आहे. गावातील प्रश्न स्थानिक स्तरावरच मार्गी लावण्याची जबाबदारी असताना, अतिक्रमणांसारख्या गंभीर विषयावर प्रभावी कारवाई न झाल्याने नागरिकांना वरिष्ठ प्रशासनाकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे स्वतःच्या कामगिरीची पाठ थोपटून घेणारे पदाधिकारी प्रत्यक्षात स्थानिक पातळीवरील प्रश्न आणि वाद मिटविण्यात कितपत यशस्वी ठरले आहेत, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, मोजणीनंतर अतिक्रमणांवर कारवाई करताना सर्वांसाठी समान निकष लागू केले जातील की ‘आपला माणूस’ आणि ‘परका माणूस’ असा भेद केला जाईल, याबाबतही नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. अतिक्रमणांवर कारवाई करताना कोणताही राजकीय, सामाजिक किंवा गटबाजीचा प्रभाव न पडता नियमांचे समान पालन होणे आवश्यक असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

आता होणारी अधिकृत मोजणी ही गावठाण हद्दीतील वास्तव परिस्थिती समोर आणणारी ठरणार असून, त्यानंतर प्रशासन सर्व अतिक्रमणांवर समान निकष लावून कारवाई करते की निवडक कारवाईचा मार्ग अवलंबते, यावरच या मोहिमेची विश्वासार्हता अवलंबून राहणार आहे. त्यामुळे मोजणीच्या निष्कर्षांइतकेच त्यानंतर होणाऱ्या प्रशासकीय कारवाईकडेही ग्रामस्थांचे लक्ष लागले असून, गावठाण हद्दीतील अतिक्रमणांचा प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लागणार की पुन्हा एकदा कागदोपत्रीच राहणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!