
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमातर्गत विविध प्रकल्पांसाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल. कार्यक्रमाच्या टप्पा दोन अंतर्गत होणाऱ्या या कामातून कृष्णा खोरे आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत विविध सिंचन प्रकल्पातील कामांसाठी गती मिळेल असा विश्वास जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
मंत्रालयात जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याप्रसंगी आमदार सत्यजित पाटील , आमदार अमोल जगताप, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ हनुमंत धुमाळ, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळचे कार्यकारी संचालक जयंत गवळी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम राज्यातील पूर्ण झालेल्या १५५ जलसिंचन प्रकल्पांच्या कालवे व वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या कामासाठी ५ हजार ३६ कोटी रुपये तरतुदीसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नाबार्ड च्या माध्यमातून निधी उपलब्धतेच्याया दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून कामास गती दिली जाईल.
अपूर्ण सिंचन प्रकल्प तसेच पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करणेसाठी या टप्प्यातील ७५०० कोटीपैकी गोदावरी व कृष्णा खो-यात निधी उपलब्ध होणार असून सदयस्थिती झालेला खर्चबाबतचा आढावा घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीत यापूर्वीच महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचन क्षमता यामधील तफावत दूर करण्याच्या दृष्टीने प्रथम टप्यात महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत २१ प्रकल्पांना व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत १० प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
यामध्ये महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर एकूण ३१ प्रकल्पांच्या बाबत चर्चा करण्यात आली. गोदावरी उजवा तट कालवा प्रकल्पाचा टप्पा २ मधून टप्पा १ मध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रवरा डावा व उजवा कालवा दुरुस्ती व भोजापूर मध्यम प्रकल्प या प्रकल्पांचा प्रथम टप्यात नव्याने समावेश करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.




