अहिल्यानगर जिल्हाश्रीरामपूर तालुका

फटाक्यांच्या पैशांच्या वादातून चुलत्याची निर्घृण हत्या; स्विफ्ट कार अंगावर घालून संपवले!

तलवारीने वार करण्याचाही प्रयत्न; श्रीरामपूर हत्याकांडातील दोन आरोपी २४ तासांत जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – दिवाळीच्या सणात फटाक्यांच्या पैशांवरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर येथे घडली. फटाके घेऊन पैसे न दिल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादात तरुणावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी स्विफ्ट कारने त्याच्या घरी जाऊन चुलते शफी नवाब पठाण यांच्या अंगावर दोन वेळा कार घालून त्यांची हत्या केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेने श्रीरामपूर परिसरात खळबळ उडाली असून, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने वेगवान तपास करत दोन आरोपींना अवघ्या २४ तासांत अटक केली आहे.

दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता फिर्यादी मोईनुद्दीन शकील पठाण (वय २३, रा. पंचशील कॉलनी, टिळकनगर, श्रीरामपूर) यांनी दिवाळीनिमित्त कामगार चौक, टिळकनगर येथे फटाक्यांचे दुकान सुरू केले होते. यावेळी सागर राहुल गुंजेकर, आनंद अमर पवार, अमित रविकांत पटारे, उमर शेख व इतर आरोपी फटाके घेऊन पैसे न देता निघून गेल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून अमित पटारे याने फिर्यादीवर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादीने वार चुकवल्याने तो बचावला.

त्यानंतर आरोपी स्विफ्ट कारमधून फिर्यादीच्या घरी पोहोचले. तेथे फिर्यादीचे चुलते शफी नवाब पठाण यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या उद्देशाने दोन वेळा कार घालण्यात आली. या भीषण हल्ल्यात शफी पठाण यांचा मृत्यू झाला. किरकोळ आर्थिक वादातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष तपास पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे व पथकातील कर्मचाऱ्यांनी गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला.

९ नोव्हेंबर रोजी उमर समीर शेख आणि अमित रविकांत पठारे हे नेवासा तालुक्यातील वांजुळी परिसरात असल्याची गोपनीय माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवून दोघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये उमर समीर शेख (वय २२, रा. सम्राटनगर, सुतगिरणी फाटा, श्रीरामपूर) आणि अमित रविकांत पठारे (वय २१, रा. दत्तनगर, सुतगिरणी रोड, श्रीरामपूर) यांचा समावेश आहे. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०८९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १०९(१), ११८(१), १८९(२), १९० तसेच आर्म्स ॲक्ट कलम ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.या कारवाईत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे तसेच पथकातील अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!