अहिल्यानगर जिल्हा

स्नेहालयच्या ‘उमेद’तर्फे एकल महिलांसाठी मायेची भाऊबीज!

१५० महिलांना साडी, फराळ व किराणा किटचे वाटप; बालविवाहमुक्त समाजाची प्रतिज्ञा!

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर – दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या संवेदनशील भावनेतून स्नेहालय संचलित बालभवनच्या ‘उमेद’ उपक्रमाने साऊ एकल महिला समिती आणि जिल्हा डाक विभागाच्या संयुक्त विद्यमाने माणुसकीची भाऊबीज साजरी केली. रेहेमत सुलतान हॉल येथे आयोजित या स्नेहसोहळ्यात अहिल्यानगर परिसरातील १५० एकल महिलांना साडी, दिवाळी फराळ आणि किराणा किटचे वाटप करण्यात आले. महिलांना आपुलकी, सन्मान आणि सामाजिक आधार देण्याचा हा उपक्रम भावस्पर्शी ठरला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ‘उमेद’ उपक्रमाच्या समन्वयक यास्मिन शेख म्हणाल्या, “एकल महिला एकटी असू शकते; पण असहाय्य नाही. तिच्यात संकटांवर मात करून नव्याने आयुष्य उभे करण्याची ताकद आहे. दिवाळीनिमित्त दिलेली साडी, फराळ आणि किराणा किट ही केवळ वस्तुरूप मदत नसून, ‘तुम्ही एकट्या नाहीत, समाज तुमच्या पाठीशी आहे,’ हा विश्वास देणारी स्नेहभेट आहे.”

अहिल्यानगर शहर व परिसरातील सुमारे ४५० एकल महिलांसोबत ‘उमेद’ प्रकल्प सातत्याने कार्यरत आहे. महिलांना आधारकार्ड, महा आयडी, आयुष्मान भारत कार्ड, आभा हेल्थ आयडी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रकल्पाच्या माध्यमातून मदत केली जाते. ब्युटी पार्लर, शिवणकाम, मेहंदी आणि हँड एम्ब्रॉयडरी यांसारख्या रोजगाराभिमुख प्रशिक्षणातून आतापर्यंत २१४ महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावर्षी हस्तनिर्मित साबण निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला असून, उत्पादन, गुणवत्ता, पॅकेजिंग आणि विक्रीचे प्रशिक्षण देऊन महिलांना स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक सदस्य हेरंब कुलकर्णी यांनी एकल महिलांच्या भावनिक, सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, “सण आला की अनेक एकल महिलांच्या दुःखाच्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. अशा महिलांच्या दुःखाच्या क्षणी त्यांच्यासोबत उभे राहणे आणि त्यांनाही आनंदात सहभागी करून घेणे ही केवळ मदत नसून सामाजिक बांधिलकी आहे.” एकल महिलांचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरण करण्यासाठी रोजगारनिर्मिती, शासकीय योजनांची जोडणी, कायदेशीर मदत, मालमत्तेचे हक्क, बचत गटांमधील सहभाग आणि पुनर्विवाहाबाबत सकारात्मक सामाजिक दृष्टिकोन निर्माण करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. शहरी गरिबांसाठी काम करणाऱ्या संस्थांसाठी ‘उमेद’ प्रकल्प दिशादर्शक ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

प्रमुख पाहुणे डॉ. पी. व्ही. राजगोपाल यांनी समाजातील शेवटच्या आणि वंचित घटकापर्यंत पोहोचून काम करणे हीच खरी सामाजिक सेवा असल्याचे सांगितले. सणाच्या माध्यमातून गरजू महिलांसोबत आनंद वाटून घेणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी संत ज्ञानेश्वरांच्या “मी अविवेकाची काजळी । फेडोनि विवेकदीप उजळी । तै योगिया पाहे दिवाळी । निरंतर ॥” या विचारांचा संदर्भ देत दिवाळीचा खरा अर्थ स्पष्ट केला. ते म्हणाले, “दिवाळी म्हणजे केवळ घरात दिवे लावणे नव्हे, तर मनातील अंधकार दूर करून ज्ञान, विवेक, प्रेम आणि माणुसकीचा प्रकाश निर्माण करणे होय. प्रत्येक बालकाला चांगले शिक्षण, प्रत्येक महिलेला सन्मान आणि प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित व आनंदी जीवन मिळावे, हीच आपली अपेक्षा असली पाहिजे.”

जिल्हा डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक विकासजी पालवे यांनी व्यावसायिक जीवनासोबत सामाजिक जबाबदारी जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सामाजिक संस्थांना सहकार्य करण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करत अशा प्रयत्नांतून समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे दिवाळीच्या आनंदासोबत सामाजिक परिवर्तनाचा दिलेला संदेश. स्नेहालयच्या ‘उडान’ प्रकल्पाच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधाची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी उपस्थित सर्वांना बालविवाहमुक्त समाज निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा दिली. प्रत्येक मुलीला शिक्षणाची संधी, प्रत्येक बालकाला सुरक्षित बालपण आणि बालविवाहमुक्त समाजनिर्मितीची जाणीव व्हावी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या स्नेहसोहळ्याला हेरंब कुलकर्णी, डॉ. पी. व्ही. राजगोपाल, डॉ. जिल केर-हॅरिस, विकासजी पालवे, डॉ. गिरीश कुलकर्णी, वैशाली चोपडा, ॲड. श्याम असावा, हनीफ शेख यांच्यासह स्नेहालयचे पदाधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक आणि हितचिंतक उपस्थित होते. बालभवनच्या मानद संचालिका वैशाली चोपडा यांनी, “मदतीचा हात देऊया, स्वावलंबनाची वाट दाखवूया; एकल महिलांच्या आयुष्यात केवळ दिवे नाही, तर आशेचा नवा सूर्य उजळवूया,” या संदेशातून कार्यक्रमाची सांगता केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा साळवे यांनी केले, तर मान्यवरांची ओळख उषा खोल्लम यांनी करून दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजू पांढरे, रुबीना शेख, जयश्री शिंदे, विनापल्ली, मीनाक्षी, शारदा ज्ञानपल्ली, शहीद शेख आदींनी परिश्रम घेतले.

एकल महिलांच्या सन्मानाचा, स्वावलंबनाचा आणि माणुसकीच्या नात्यांचा हा सोहळा केवळ भाऊबीजेपुरता मर्यादित न राहता समाजाला संवेदनशीलतेचा संदेश देणारा ठरला. एकीकडे एकल महिलांच्या आयुष्यात आपुलकीचा प्रकाश पोहोचवताना दुसरीकडे बालविवाहमुक्त समाजाची प्रतिज्ञा घेण्यात आली. खऱ्या अर्थाने दिवाळी तेव्हाच उजळते, जेव्हा तिचा प्रकाश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतो.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!