(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
कोपरगाव – पर्जन्यछायेच्या प्रदेशात असलेल्या कोपरगाव तालुक्यात कमी व अनियमित पर्जन्यमान, भूजल पातळीत होणारी घट आणि सिंचनाच्या मर्यादित सुविधा यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रत्येक गावाचा स्वतंत्र गावनिहाय मृद व जलसंधारण विकास आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, असे साकडे आ. विवेक भैय्या कोल्हे यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना घातले आहे.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास मंत्री संजय राठोड यांनी ६ नोव्हेंबर रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी ऊसतोड मजुरांसमवेत दिवाळी साजरी केली. याप्रसंगी आ. कोल्हे यांनी त्यांना यासंदर्भातील निवेदन सादर केले. आ. कोल्हे यांच्या निवेदनाची दखल घेत मंत्री संजय राठोड यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कोपरगाव तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांसाठी गावनिहाय आराखडा तयार करण्याच्या मागणीसंदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. संबंधित विभागाच्या माध्यमातून प्रस्तावित कामांचा आढावा घेऊन आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
निवेदनात आ. कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील पाणीटंचाई आणि जलसंधारणाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. यावर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे कोपरगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश झाला आहे. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये कमी व अनियमित पाऊस, भूजल पातळीत सातत्याने होणारी घट, पाण्याचा अपुरा साठा आणि शेतीसाठी सिंचनाच्या मर्यादित सुविधा यामुळे शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे.
तालुक्यातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याने पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी गावनिहाय नाला खोलीकरण व रुंदीकरण, जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण, सिमेंट व माती नाला बांधांची उभारणी, पाझर तलाव व लघु जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन तसेच जलसाठ्यांमधील गाळ काढणे आदी कामे प्राधान्याने हाती घेण्याची गरज निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच शेततळे व जलपुनर्भरण संरचनांची निर्मिती, सलग समतल चर, समतल बांध आणि समोच्च रेषांवरील बांधबंदिस्ती यांसारखी कामे करून पावसाचे पाणी अडविणे व जमिनीत मुरविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक गावाची भौगोलिक परिस्थिती, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र गावनिहाय मृद व जलसंधारण विकास आराखडा तयार करावा. या आराखड्यातील प्रस्तावित कामांना मंजुरी देऊन त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. यासाठी संबंधित विभागाला आपल्या स्तरावरून तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी आ. विवेक भैय्या कोल्हे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.