(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – संगमनेर शहरातील अवैध गोवंश कत्तलीच्या प्रकारावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. शहरातील जमजम कॉलनी आणि मदिनानगर परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी केली. या कारवाईत तब्बल ८०० किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे आणि पाच गोवंशीय जनावरे असा एकूण ३ लाख ८० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले होते.
१० नोव्हेंबर रोजी हे पथक संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायांची माहिती घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. समीर हसन कुरेशी हा गोवंशीय जनावरे खरेदी करून साथीदारांच्या मदतीने गल्ली क्रमांक ९, जमजम कॉलनी येथील पत्र्याच्या शेडमध्ये त्यांची कत्तल करत असल्याचे समजले. तसेच काही जनावरे गल्ली क्रमांक ४, मदिनानगर येथील काटवनात डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीची पंचांसमक्ष खात्री केल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या कारवाईत पोलिसांनी समीर हसन कुरेशी (वय ५५), सोनू उर्फ फैजान शाहीद कुरेशी (वय २०), महमंद अहमद अब्दुलवाहब कुरेशी (वय ३५), शाहीद गणी कुरेशी (वय ४२) आणि मुजम्मील अब्दुलहमीद इनामदार (वय ३३) या पाच जणांना ताब्यात घेतले.
छापेमारीदरम्यान पोलिसांनी २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सुमारे ८०० किलो गोमांस, २०० रुपये किमतीचा एक चाकू व सत्तूर तसेच १ लाख ४० हजार रुपये किमतीची पाच गोवंशीय जनावरे असा एकूण ३ लाख ८० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पाच गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली.
ताब्यात घेतलेल्या पाचही जणांना जप्त मुद्देमालासह संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १०६९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २७१, ३२५, ३(५) तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत.
संगमनेर शहरात गोवंशीय जनावरांची खरेदी, वाहतूक, साठवणूक आणि कत्तलीसाठी जागा उपलब्ध करून देण्यामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का, याचाही तपास होणे आवश्यक आहे. जप्त करण्यात आलेल्या जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, पुरवठादार आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी झाल्यास या प्रकारामागील संपूर्ण साखळी उघड होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे या कारवाईनंतर अवैध कत्तलीच्या व्यवसायाशी संबंधित इतरांचीही चौकशी होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.