
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील वाकडी खंडोबाची हे गाव शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर आक्रमक भूमिका घेणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात गेल्या आठ दिवसांपासून सरकारने जाहीर केलेल्या अटी-शर्ती असलेल्या कर्जमुक्तीच्या आदेशाविरोधात बैठका घेऊन शेतकरी जागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
शेतकरी संघटनेने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारला आठ दिवसांची मुदत दिली असून, त्यानंतरही निर्णयात बदल न झाल्यास साखळी उपोषण व अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सरकारने काढलेला अटी-शर्तींचा आदेश रद्द करून विना अट सरसकट कर्जमुक्ती जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांच्या उपस्थितीत सरकारच्या चुकीच्या व जाचक कर्जमुक्ती आदेशाची गावातील प्रमुख चौकात प्रतीकात्मक होळी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधी घोषणा देत आदेशाचा निषेध नोंदविला.या आंदोलनात सुरेश लहारे, बी. एल. आहेर, सावळेराम आहेर, महेश लहारे, भागवत शेळके, रमेश लहारे, चांगदेव पावसे, विष्णूपंत कोते, रामभाऊ लहारे, पोपट भालेराव, प्रकाश आहेर, तात्यासाहेब आहेर, रावसाहेब पाडांगळे, भिमराज भवार, आण्णासाहेब गोरे, जाकीरभाई शेख आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके म्हणाले की,सरकारने जाहीर केलेली कर्जमुक्ती ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून त्यामध्ये अनेक अटी-शर्ती घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत. सरकारने हा जाचक आदेश तात्काळ रद्द करून विना अट सरसकट कर्जमुक्ती जाहीर करावी. जोपर्यंत सरकार हा निर्णय बदलत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यावा.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी सरकारच्या कर्जमुक्ती आदेशाची होळी करून तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.




