Uncategorized

गणेशच्या कार्यक्षेत्रातून एक लाखाहून अधिक उसाची विल्हेवाट झाली;हे गणेश परिसराच्या दृष्टीने योग्य नाही-माजी मंत्री बाळासाहेब थोरात

श्री गणेश कारखाना गळीत हंगामाची थोरात-कोल्हे यांच्या उपस्थितीत सांगता 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहाता – श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून एक लाखाहून अधिक उसाची विल्हेवाट झाली. हे गणेश परिसराच्या दृष्टीने योग्य नाही. गणेश चांगला चालला तर या परिसराची अर्थव्यवस्था चांगली राहील. या भागातील शेतकऱ्यांनी गणेश ला च ऊस द्यावा, गणेश कारखाना या परिसराचे हक्काचे साधन आहे, त्याला सभासद, शेतकरी यांनी जपावे, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. 

      श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025- 26 या गळीत हंगामाची सांगता माजी मंत्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व संजीवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते झाली. त्याप्रसंगी श्री थोरात बोलत होते. याप्रसंगी गणेश कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे व्हा. चेअरमन विजय दंडवते, माजी चेअरमन ॲड. नारायणराव कार्ले, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, शिवाजीराव लहारे, कार्यकारी संचालक जी. बी. शिंदे, संगमनेरचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, संजीवनीचे जनरल मॅनेजर दिवटे, ॲड . पंकज लोंढे, धनंजय गाडेकर, नगरसेवक शशिकांत लोळगे, विक्रांत दंडवते यांच्यासह गणेश कारखान्याचे संचालक मंडळ, माजी संचालक, सभासद, शेतकरी, ऊस तोड ठेकेदार, कारखान्याचे अधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     प्रारंभी गणेश कारखान्याचे संचालक नानासाहेब काशिनाथ नळे व त्यांच्या पत्नी सुनीता, संचालक बाळासाहेब पुंडलिक चोळके व त्यांच्या पत्नी संगीता या उभयतांच्या हस्ते सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. 

     आपल्या भाषणात माजी मंत्री बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, गणेश कारखानाच्या वाटचालीत संकट आणि अडथळ्याची मालिका सुरू आहे, रोज वाटेत काटे टाकण्याचे काम चालूच आहे, साडेतीन लाख टनऊस गाळपास होता. उसाची पळवा पळवी झाली. गणेश या परिसराची कामधेनू आहे. अशाने या परिसराची अर्थव्यवस्था खिळखिळी होईल. वास्तविक गणेश चांगला चालण्यासाठी या भागातील सभासद शेतकरी यांनी आपला ऊस गणेशलाच दिला पाहिजे. गणेश वरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. खरे तर कोल्हे व आम्ही गणेशला समर्थ करण्याचेच काम करत आहोत. कारखाना पुढे कसा जाईल याचाच विचार आम्ही करतो. गणेश कारखान्याची गाळप क्षमता आपण वाढवू, मोलाचे रूपांतरण कुठे करायचे ते ठरवू, काही कारखान्यांनी त्यांच्या गाळप क्षमता वाढवल्या आहेत. त्यामुळे ते इकडे तिकडे घुसतात, गणेश परिसरातील उसाची विल्हेवाट नको, गणेश या परिसराचे हक्काचे साधन आहे त्याला जपले पाहिजे, आम्ही ऊस जाळायची वेळ येऊ देणार नाही. तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू, आम्ही तुमच्या मदतीला आलो आहोत. विवेक कोल्हे यांनी गणेशला चांगली मदत केली आहे.निळवंडे धरणाचे पाणी आपण आणू शकलो, हा आपल्याला आनंद आहे, ते पाणी कुठे जाऊ त्याची काळजी नाही. गणेश परिसर फुलला पाहिजे म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. 

    आपल्या भाषणात कोल्हे कारखाना चेअरमन विवेक कोल्हे म्हणाले, गणेश कारखान्याचे या गाळाप हंगामात साडेतीन लाख मॅट्रिक टन ऊस गाळपाची उद्दिष्ट होते. परंतु उसाची कार्यक्षेत्रातून होणारी विल्हेवाट, तसेच कारखान्यातील तांत्रिक अडचणी यामुळे कारखाना 90 दिवस चालला. आणि त्यातून दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळप करू शकला. गणेशच्या कार्यक्षेत्रातून विखे कारखान्याने 80 हजार टन, कोळपेवाडी कारखान्याने 40000 टन ऊस नेला. तसेच इतर कारखान्याने 35 हजार टन ही ऊस नेला अशी दीड ते 1 लाख 60 हजार मेट्रिक टन उसाची विल्हेवाट झाली. कुणीही येऊन आक्रमण करावे अशी अफगाणिस्तानची अवस्था असते, तसे उसाच्या बाबतीत गणेश ची अवस्था झाली आहे.  

 

     गणेश कारखान्यात आधुनिकीकरण केल्याने अनेक चांगले फायदे झाले. गणेश कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पुढील हंगामासाठी 2 लाख 60 हजार मेट्रिक टन ते 3 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल. जर पुढील हंगामात इतर कारखान्यांनी गणेशच्या कार्यक्षेत्रात उसाची विल्हेवाट लावली तर आम्हीही त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात टोळ्या टाकू असा इशारा श्री विवेक कोल्हे यांनी दिला. 

 

    गणेश कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे म्हणाले, संगमनेर व संजीवनी या दोन्ही कारखान्यांचे या गाळप हंगामासाठी सहकार्य मिळाले. टरबाइन चा खोळंबा झालेला असतानाही कारखान्याने दोन्ही नेत्यांच्या सहकार्याने दोन लाख मेट्रिक टन गाळप केले. कारखान्याचे पेट्रोल पंप सुरू झाला. कारखान्याच्या यंत्रातही चांगले बदल केले. काही कारखान्यांनी गणेश कारखान्याचा ऊस पळवून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचा गणेश कारखान्याच्या काट्यावर विश्वास आहे. त्यामुळे पुढील हंगामात विल्हेवाट झालेला ऊस पुन्हा गणेश कारखान्याला येईल असा विश्वास चेअरमन लहारे यांनी व्यक्त केला. 

 

   प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. बी. शिंदे यांनी केले. गणेश कारखान्याकडे पुढील हंगामासाठी 2529 हेक्टर क्षेत्राची नोंद आतापर्यंत झाली आहे. पुढील हंगामासाठी साडेतीन लाख मे. टन गाळपाचे नियोजन आहे. एक नवीन काटा. बॉयलिंग हाऊसचे कामही पूर्ण झाले आहे. गणेशने उत्पादित केलेला साखरेचा दर्जाही उत्तम आहे. अधिकारी कामगार यांनी चांगले काम केले आहे असे ही श्री. शिंदे म्हणाले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारखान्याचे सेक्रेटरी नितीन भोसले यांनी केले. तर आभार संचालक आलेश कापसे यांनी मानले. प्रसंगी गंगाधर पा.चौधरी,डॉ.एकनाथ गोंदकर,संचालक बाबासाहेब डांगे, शोभाताई गोंदकर, संपतराव हिंगे, गंगाधर डांगे, भगवानराव टिळेकर, महेंद्र गोर्डे, ज्ञानदेव चोळके, अनिल गाढवे, विष्णुपंत शेळके, संपतराव चौधरी, अरुंधती फोपसे, मधुकर सातव, अरविंद फोपसे, बलराज धनवटे, लताताई डांगे, आप्पासाहेब बोठे, रघुनाथ गाडेकर, कोंडाजी लांडगे,रामभाऊ बोरबने, उत्तमराव मते, कैलासराव रहाने,अनिल बोठे, मधुकर वाबळे, शरद कडू, संजय शेळके, चंद्रभान गुंजाळ, नानासाहेब गव्हाणे, भीमराज लहारे, विठ्ठलराव शेळके, शंकरराव जेजुरकर, रतनराव धनवटे, पंडितराव धनवटे, दिलीपराव क्षीरसागर, प्रवीण घोडेकर, बी. एल. आहेर, ज्ञानदेव शेळके, शशिकांत लोळगे,राजेंद्र रकटे,प्रा. एल. एम. डांगे, ॲड. अतुल लहारे, संगमनेर कारखाना कार्यकारी संचालक श्री घूगरकर,आदींसह सभासद, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!