
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर – शहरातील इराणी गल्ली परिसरात आज बुधवारी दुपारी मोठा तणाव निर्माण झाला. पुण्यातील एका गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी आलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर आरोपीच्या समर्थकांनी दगडफेक करत घेराव घातल्याची घटना घडली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी हवेत गोळीबार केला.
पुण्यातील पिंपरी-चिंचवड अंतर्गत तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी आयात बाबुलाल सय्यद याच्या शोधासाठी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पथक श्रीरामपूरात दाखल झाले होते. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीच्या समर्थकांसह काही महिलांनी पोलिसांवर दगडफेक करत हल्ला चढवला.
या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर सायंकाळी पुणे पोलिसांनी आरोपी आयात सय्यद याला ताब्यात घेऊन पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.




