
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
चितळी – न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, चितळी येथील 1999-2000 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा 25 वर्षांनंतर अतिशय आनंदमय आणि भावनिक वातावरणात पार पडला. दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा माजी शिक्षकांनी हातात खडू व छडी धरून “दहावीचा वर्ग” भरवला, तर माजी विद्यार्थीही शालेय दिवसांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मोठ्या उत्साहाने एकत्र जमले.
रविवार, दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता सर्व माजी विद्यार्थी महाविद्यालयाच्या प्रांगणात एकत्र जमले.प्रारंभी माजी विद्यार्थ्यांनी सनई-चौघड्याच्या गजरात शिक्षकांचे स्वागत केले.व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर शिक्षकांचा फेटा बांधून व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाची घंटा वाजवून विद्यार्थी एकत्र आले.त्यानंतर “रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे” या शालेय प्रार्थनेने व राष्ट्रगीताने स्नेहमेळाव्याचा शुभारंभ झाला.

25 वर्षांनंतर भरलेल्या या स्नेहमेळाव्यास माजी विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळेच्या प्रांगणात पाऊल ठेवताच जुन्या आठवणींनी सर्वांना भूतकाळात नेले. शाळेच्या विकासासाठी व सध्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आर्थिक मदतीचा हात देण्याची ग्वाही सर्व माजी विद्यार्थ्यांनी दिली.

यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन सर्व माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक एन. डी. शेख होते.यावेळी किसन ओमणे, चव्हाण मॅडम, वनकर मॅडम, चौधरी गुरुजी, बैसाणे गुरुजी यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते.

या स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनात शाळेचे शिक्षक माजी अरुण झुराळे सर, कालंगडे सर, कैलास वाघ सर, गंगाराम कुंदे सर यांनी विद्यार्थ्यांना विशेष मदत केली.सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आबासाहेब जोशी, डॉ. गोरक्षनाथ चौधरी, डॉ. प्रशांत लोकरे, किशोर वाघ, सागर कातोरे, सचिन गलांडे, प्रकाश गलांडे, नवनाथ वाघ या माजी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत फटाक्यांची आतषबाजी केली आणि आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी, शिक्षकवर्ग व कुटुंबीयांनी एकत्र बसून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि या दिवसाला अविस्मरणीय आठवण बनवली.




