
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – १५ ऑगस्ट रोजी भारत माता ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना, स्नेहालयात आणखी एका स्वातंत्र्याची लढाई सुरु होती. अवघ्या १२ वर्षांची एक चिमुकली मुलगी आणि सहा महिन्यांची गर्भवती असलेली मुक्ता (बदललेले नाव) अमानुष वेदनांनी विव्हळत होती. स्नेहालयाच्या उडान आणि मुक्तीवाहिनी टीमच्या शौर्यपूर्ण हस्तक्षेपामुळे मुक्ताचे प्राण वाचले, आरोपीला अटक झाली आणि तिच्या बालपणासाठी नवा लढा सुरू झाला.
स्नेहालयात दरवर्षी स्वातंत्र्य दिनी सर्व बालकांचा सामूहिक वाढदिवस साजरा होतो. परंतु यावर्षीच्या जल्लोषात राहुरी येथून आलेल्या एका फोनने स्नेहालय कार्यकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकवली. डॉक्टरांकडून समजले की, केवळ ११ वर्षांची पूर्ण करून बाराव्या वर्षात पाऊल ठेवलेल्या मुलीला पाच महिन्यांचा गर्भ आहे. तिचे वजन केवळ २९ किलो व एचबी ८ असल्याने परिस्थिती गंभीर होती.
स्नेहालयाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून मुक्तेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तपासणीत धक्कादायक वास्तव समोर आले – तिच्यावर स्वतःच्या मावस भावाने सातत्याने बलात्कार करून गर्भवती केले होते. धमक्यांच्या छायेत राहिलेली मुक्ता काहीही बोलण्यास घाबरत होती. पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अल्पावधीतच जेरबंद केले.
दरम्यान, मुक्तेला अचानक रक्तस्त्राव होऊन तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. तिने बालकाला जन्म दिला, मात्र बाळाने केवळ सहा श्वास घेतले आणि मृत्यू झाला. डॉक्टरांनी मात्र मुक्ताचे प्राण वाचवले. या घटनेनंतर ती अबोल झाली असून, सतत जमिनीकडे पाहत बसते.
स्नेहालय मुक्तीवाहिनी टीमचे प्रवीण कदम, सीमा जुनी, शाहिद शेख, पूजा दहातोंडे, संतोष धर्माधिकारी, निलेश सरोदे, राहुल वैराळ यांनी संयम, गुप्तता आणि धैर्याने केलेल्या प्रयत्नांमुळे एक बालजीवन वाचले. आरोपीच्या समाजाकडून दबाव येऊनही कार्यकर्त्यांनी न्यायाची लढाई सुरु ठेवली असून“ही लढाई इथे संपत नाही. मुक्तेचे पुनर्वसन, शिक्षण व आरोपीला कठोर शिक्षा मिळेपर्यंत स्नेहालय हा लढा लढत राहील.” असे स्नेहालयाचे संचालक हनीफ शेख म्हणाले.




