
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – दि. २६ सप्टेंबर २०२६ : रात्रीच्या वेळी संकटग्रस्त, बेवारस, हरवलेली तसेच बालमजुरी, बालभिक्षा, बालविवाह आणि अन्य प्रकारच्या शोषणाच्या धोक्यात असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना तातडीने मदत, संरक्षण आणि आवश्यक सेवांशी जोडण्यासाठी स्नेहालयच्या उडान प्रकल्प व मुक्ती वाहिनीच्या वतीने नाईट पेट्रोलिंग करण्यात आले. बालसुरक्षेच्या दृष्टीने शहरातील संवेदनशील भागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांमध्येही बालसंरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या मोहिमेत करण्यात आला.
या नाईट पेट्रोलिंगमध्ये उडान प्रकल्पाच्या मानद संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे प्रशांत गायकवाड, चाइल्ड हेल्पलाइनचे राहुल वैराळ, राहुल कांबळे यांच्यासह उडान व मुक्ती वाहिनीच्या पथकाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, तुळजापूर येथील विद्यार्थ्यांनी तसेच भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभागी होत बालसंरक्षणाच्या प्रत्यक्ष क्षेत्रातील कामकाजाचा अनुभव घेतला.
नाईट पेट्रोलिंगची सुरुवात रात्री ७ वाजता स्नेहालय उडान प्रकल्प, चित्रा टॉकीजसमोर, गांधी मैदान येथून करण्यात आली. त्यानंतर ७.१५ ते ८ वाजेपर्यंत रेल्वे स्टेशन परिसराची, ८ ते ९ वाजेपर्यंत पुणे बसस्थानक, माळीवाडा बसस्थानक व परिसराची, तर ९ ते १० वाजेपर्यंत तारकपूर परिसराची पाहणी करण्यात आली. शेवटच्या टप्प्यात १० ते ११ वाजेपर्यंत पत्रकार चौक, प्रेमदान चौक, प्रोफेसर चौक आणि तोफखाना पोलीस स्टेशन परिसराची पाहणी करून नाईट पेट्रोलिंगची सांगता करण्यात आली.
या दरम्यान सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी आढळणाऱ्या बालकांची परिस्थिती जाणून घेण्याबरोबरच, बालक कोणासोबत आहे, त्याला सुरक्षित ठिकाण उपलब्ध आहे का, तो हरवलेला किंवा बेवारस आहे का, तसेच बालमजुरी किंवा इतर शोषणाच्या धोक्यात तर नाही ना, याबाबत संवेदनशीलतेने माहिती घेण्यात आली. संभाव्य धोका आढळल्यास संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून बालकाला संरक्षण देणे आणि पुढील प्रक्रियेशी जोडणे, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग होता.
नाईट पेट्रोलिंगदरम्यान रिक्षाचालक, दुकानदार, चहा-पानटपरी चालक, सुरक्षा रक्षक, फेरीवाले तसेच रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या विविध नागरिकांशी संवाद साधण्यात आला. शहरातील रस्ते, बसस्थानके, रेल्वे परिसर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी संकटग्रस्त बालक आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने संबंधित हेल्पलाइन किंवा यंत्रणेला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. बालसुरक्षेच्या कामात हे नागरिक महत्त्वाचे ‘पहारेकरी’ ठरू शकतात, हा संदेश यावेळी देण्यात आला.
या मोहिमेचे प्रमुख संचालन स्नेहालय उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आवेज हबीब यांनी केले. नाईट पेट्रोलिंगच्या नियोजनापासून प्रत्यक्ष क्षेत्रीय कामापर्यंत उडान व मुक्ती वाहिनीच्या पथकाने समन्वयाने काम केले. भारती विद्यापीठाचे विद्यार्थी श्रीकांत याळवंडे तसेच उडान प्रकल्पाचे शशिकांत शिंदे, महेश शिंदे, तुषार केदारी आणि नेहा धिवरे यांनीही मोहिमेसाठी विशेष परिश्रम घेतले.
बालसंरक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या पथकासोबत विद्यार्थ्यांनी रात्रीच्या प्रत्यक्ष नाईट पेट्रोलिंगमध्ये सहभागी होणे ही या उपक्रमाची विशेष बाब ठरली. वर्गातील शिक्षणाबरोबरच समाजातील वास्तव परिस्थिती समजून घेणे, संकटग्रस्त बालकांची लक्षणे ओळखणे, संबंधित यंत्रणेशी समन्वय साधणे आणि प्रतिबंधात्मक सामाजिक कार्याची भूमिका समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळाली.
स्नेहालयच्या मुक्ती वाहिनीच्या माध्यमातून संकटग्रस्त बालकांच्या संरक्षणासाठी सातत्याने कार्य केले जात असून, नाईट पेट्रोलिंग हा त्याच प्रतिबंधात्मक कार्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. बालक संकटात सापडल्यानंतर मदत करण्याबरोबरच संकटाची शक्यता असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहोचून परिस्थिती समजून घेणे आणि वेळेपूर्वी हस्तक्षेप करणे, या दृष्टिकोनातून अशा मोहिमांचे आयोजन करण्यात येते.
बालकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन, पोलीस, बाल संरक्षण यंत्रणा, सामाजिक संस्था आणि नागरिक यांचा समन्वय आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या परिसरात कोणतेही बालक बेवारस, हरवलेले, बालमजुरी किंवा बालभिक्षेत अडकलेले, बालविवाहाच्या धोक्यात अथवा अन्य संकटग्रस्त अवस्थेत आढळल्यास नागरिकांनी तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
मुक्ती वाहिनी – ९०११०९८००८ | उडान हेल्पलाइन – ९०११०२६४९५ | चाइल्ड हेल्पलाइन – १०९८ | पोलीस – ११२ “रात्रीच्या अंधारात संकटात असलेल्या बालकापर्यंत पोहोचणे, त्याचे संरक्षण करणे आणि सुरक्षित भविष्याची दिशा देणे” या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या नाईट पेट्रोलिंगमधून बालसुरक्षेसाठी समाजातील प्रत्येक घटकाने सजग राहण्याचा संदेश देण्यात आला.




