धार्मिकप्रशासकीयमहाराष्ट्र

शिर्डी साईबाबा संस्थानच्या शिरपेचात मानाचा तुरा; तीन प्रमुख विभागांना आंतरराष्ट्रीय ‘आयएसओ’ मानांकन

संरक्षण, साईमंदिर आणि जनसंपर्क विभागाच्या कार्यपद्धतीची दखल; उत्कृष्ट व्यवस्थापन, सुरक्षा व पारदर्शक सेवेसाठी प्रमाणपत्र

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

शिर्डी – श्री साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय आणि सेवा व्यवस्थापनात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. संस्थानअंतर्गत कार्यरत असलेल्या संरक्षण विभाग, साईमंदिर विभाग आणि जनसंपर्क विभाग या तीन प्रमुख विभागांना उत्कृष्ट कार्यपद्धती, शिस्तबद्ध नियोजन, पारदर्शक सेवा आणि निर्धारित मानकांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.

शिर्डी येथील साईबाबा संस्थानचा प्रशासकीय आणि सेवा व्यवस्थापनाचा कारभार व्यापक आहे. दररोज देश-विदेशातून हजारो साईभक्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता दर्शनाचे नियोजन, सुरक्षा, निवास, भोजन तसेच विविध सेवा सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यासाठी संस्थानची प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र कार्यरत असते. संस्थानमध्ये सध्या जवळपास ६३०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून, सुमारे ४० विविध विभागांच्या माध्यमातून संस्थानचा व्यापक कारभार सांभाळला जात आहे.

साईबाबा संस्थानचे अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या जबाबदाऱ्या निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि सेवाभावाने पार पाडत आहेत. अनेक कर्मचारी आपले काम केवळ नोकरी म्हणून न पाहता साईबाबांची सेवा या भावनेतून करत आहेत. त्यामुळे संस्थानच्या कामकाजाची विविध स्तरांवर दखल घेतली जात आहे. विविध विभागांना मिळणारी आयएसओ मानांकने ही संस्थानच्या गुणवत्तापूर्ण सेवेला मिळालेली पावती मानली जात आहे.

संरक्षण विभागाकडून भाविकांच्या सुरक्षिततेसोबतच मंदिर परिसरात सापडलेल्या मौल्यवान वस्तू त्यांच्या मालकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाते. मागील दीड वर्षाहून अधिक कालावधीत सुमारे ९६ लाख रुपये किमतीचे दागिने, रोख रक्कम आणि वैयक्तिक साहित्य संबंधित भाविकांना परत करण्यात आल्याची माहिती आहे. या कार्यपद्धतीची आयएसओ ऑडिटदरम्यान दखल घेण्यात आली.

साईमंदिर विभागाकडून दररोज मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या दर्शनाचे नियोजन केले जाते. दर्शन रांगेचे व्यवस्थापन, मंदिर परिसरातील स्वच्छता, नियमित पूजा-अर्चा तसेच विविध धार्मिक उत्सवांचे नियोजन आणि व्यवस्थापन या कामकाजाचीही आयएसओ मानांकनासाठी दखल घेण्यात आली.

दरम्यान, जनसंपर्क विभागाकडून देश-विदेशातून शिर्डीत येणारे मान्यवर, माध्यमांचे प्रतिनिधी तसेच विविध प्रशासकीय प्रोटोकॉल आणि औपचारिकतांचे नियोजन व समन्वय केला जातो. या कामकाजातील शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि सेवा पद्धतीचीही आयएसओ मानांकनासाठी दखल घेण्यात आली आहे.

साईबाबा संस्थानच्या काही सेवा आणि विभागांना यापूर्वीही आयएसओ मानांकन मिळाले आहे. साई प्रसादालय, भक्तनिवास आदी सेवांच्या व्यवस्थापनाबाबतही आयएसओ मानांकनाचा उल्लेख करण्यात आला आहे. निर्धारित मानकांची अंमलबजावणी, सेवा पद्धती, नियम आणि कार्यप्रणाली यांची वेळोवेळी तपासणी करून मानांकनाचे नूतनीकरण केले जाते.

संरक्षण, साईमंदिर आणि जनसंपर्क या तीन प्रमुख विभागांना मिळालेले आंतरराष्ट्रीय आयएसओ मानांकन हे संस्थानच्या शिस्तबद्ध कार्यपद्धती, गुणवत्तापूर्ण सेवा आणि भाविककेंद्री व्यवस्थापनाची दखल घेणारे महत्त्वपूर्ण यश ठरले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!