गुन्हेगारीप्रशासकीय

अवैध वाळू वाहतुकीवर परि.पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार यांची पुन्हा धडाकेबाज कारवाई; ११ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त कारेगाव व खानापूर शिवारात दोन स्वतंत्र कारवाया; वाळूसह टेम्पो, ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

श्रीरामपूर – तालुका पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर परि-पोलीस उपअधीक्षक श्रीमती कल्पना अंबादास पवार यांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात पुन्हा धडाकेबाज कारवाई केली आहे. कारेगाव व खानापूर शिवारात करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये वाळूसह टेम्पो, ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण ११ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजता परि पोलीस उपअधीक्षक श्रीमती कल्पना अंबादास पवार व पोलीस पथकाने कारेगाव शिवारात, बिरोबा मंदिराजवळ, कारेगाव ते श्रीरामपूर जाणाऱ्या रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला. यावेळी टेम्पो चालक विजय रावसाहेब लोंढे (वय ४० वर्षे, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील अशोक लेलंड कंपनीचा एमएच १९ सीवाय २८३६ क्रमांकाचा टेम्पो व त्यामधील एक ब्रास वाळू, असा एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.रं. नं. ३७४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

त्यानंतर दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८.१५ वाजता प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक श्रीमती कल्पना पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दुसरी कारवाई करण्यात आली. खानापूर शिवारातील पेट्रोल पंपाजवळ, खानापूर ते माळवाडगाव जाणाऱ्या रस्त्यावर अवैधपणे वाळू वाहतूक करणारा सोनालीका कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्रॉली पकडण्यात आली. या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रॉली व वाळू असा एकूण ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित ट्रॅक्टर चालकाविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.रं. नं. ३७६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहेत. तसेच अवैध वाळू उत्खनन, वाळू वाहतूक व अवैध वाळू साठ्यांविरोधात यापुढेही कारवाई करण्यात येणार असून, वाळू तस्करांवर हद्दपार तसेच एमपीडीए कायद्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अहिल्यानगर, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, श्रीरामपूर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, श्रीरामपूर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत परि पोलीस उपअधीक्षक श्रीमती कल्पना पवार, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पोलीस उपनिरीक्षक सतीश डौले, सहायक फौजदार अर्जुन बाबर, पोलीस हवालदार रामेश्वर ढोकणे, पोलीस शिपाई अमोल जाधव, पोलीस शिपाई संभाजी वारे, होमगार्ड अमोल आमले, हरीष चव्हाण, सलमान सय्यद, कृष्णा आमले आणि आगरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!