
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम अनेक थोर व्यक्तींनी केले. त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. कर्मवीर अण्णांनी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष आज महाराष्ट्रातील १५ आणि कर्नाटकातील एका अशा १६ जिल्ह्यांत विस्तारला आहे. रयतच्या माध्यमातून ७४२ शाखा चालविल्या जात असून, यामध्ये ८ लाख १८ हजार ८९ विद्यार्थी आणि ११ हजार ६१७ सेवक कार्यरत आहेत.एका व्यक्तीने पाहिलेल्या स्वप्नाचा एवढा मोठा वटवृक्ष उभारला असून, सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीब तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी घडावेत, हीच कर्मवीर अण्णांची भावना होती, असे प्रतिपादन आ. विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे (दि.२६) पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा श्रीरामपूर दूध जिल्हा मध्यवर्ती सहकारी संघाचे चेअरमन रावसाहेब नाथाजी म्हस्के पाटील होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आ. विवेकभैय्या कोल्हे बोलत होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील तसेच शिक्षणमाऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांतून कर्मवीर अण्णांच्या कार्याला उजाळा दिला.
निर्मळ पिंपरी येथील न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना १९६७ साली झाली. त्यानंतर १९८५ ते १९९० या कालखंडात श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून, तसेच त्यावेळचे राज्यकर्ते आणि स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या माध्यमातून या शाळेस चार खोल्या मिळाल्या आणि या ठिकाणी शिक्षणाची गंगा सुरू झाली.तुम्हाला आणि आम्हाला घडवणारा कुठलाही एक घटक असेल, तर आपल्या आई-वडिलांच्या संस्काराबरोबरच शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. जसा कुंभार एखाद्या आकृतीला आकार देतो, जेव्हा ती माती ओली असते तेव्हा दोन्ही हातांनी आकार देता येतो. त्याचप्रमाणे दोन हात म्हणजे आपल्या आई-वडिलांचे आणि दुसरा हात शिक्षकांचा असतो. त्यामुळे शिक्षक आणि आई-वडील आपल्याला घडवतात आणि तुम्ही-आम्ही मिळून भारत देश घडवत असतो, असे आ. विवेकभैय्या कोल्हे म्हणाले.
पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायची असेल, तर त्यांच्या विचारांचा वारस म्हणून आपण शिक्षण घेतल्यानंतर समाजासाठी काहीतरी देणे लागतो, या भावनेतून आपण काम केले पाहिजे, असे आवाहन आ.विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
यावेळी आ. विवेकभैय्या कोल्हे यांनी न्यू इंग्लिश स्कूल, निर्मळ पिंपरीच्या शाळेची जागा शाळेच्या नावावर करून देण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. तसेच शाळेच्या चेनलिंक कंपाउंडची दुरवस्था झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी चेनलिंकचे कंपाउंड करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.वक्तृत्व स्पर्धेत दैदीप्यमान यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा आ. विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना आ. विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये राज्य शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आलेला असून, यामध्ये राहाता व कोपरगाव तालुका समाविष्ट आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. २४ सप्टेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीमध्ये आम्ही दुष्काळी परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष दिला होता. त्यामुळे काही अंशांनी तरी शेतकऱ्यांना व पर्यायाने त्यांच्या पाल्यांना व विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून राज्य शासन दुष्काळाच्या उपाययोजना लवकरच जाहीर करणार आहे. असे आ.विवेक भैय्या कोल्हे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देताना सांगितले.
कार्यक्रमास प्रमुख वक्ते प्रा. गोरक्षनाथ बनकर, स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब निर्मळ, मुख्याध्यापिका सौ. पिलगर एम. एम., श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सूर्यकांत निर्मळ, डी. एस. निर्मळ, दत्तात्रय निर्मळ, माजी तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ निर्मळ, मेजर रावसाहेब घोरपडे, उत्तम घोरपडे, ज्ञानदेव निर्मळ, श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल गाढवे,नानासाहेब नळे व बाळासाहेब चोळके,विशाल घोरपडे,योगेश निर्मळ व राजेंद्र निर्मळ यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.




