पर्यावरणपुणतांबामहाराष्ट्र

पावसाने दडी मारली; गोदावरीच्या विसर्गाने पुणतांबा येथील वसंत बंधारा तुडुंब

खरीप पिकांचे नुकसान; रब्बी हंगामाची चिंता कायम, बंधारा भरल्याने अडीच हजार हेक्टर क्षेत्राला दिलासा

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

पुणतांबा – पावसाळा संपत आलेला असतानाही पुणतांबा व परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, दुसरीकडे गोदावरी नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे पुणतांबा येथील वसंत बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्र तुडुंब भरले असून नदीकाठावरील गावांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राहाता तालुक्यासह पुणतांबा व परिसरात पावसाची स्थिती अत्यंत नाजूक आहे. जून महिन्यात सुरू झालेल्या पावसाळ्याला चार महिन्यांचा कालावधी झाला असला तरी परिसरात जेमतेम पाऊस झाला. या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या. मात्र, गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.परतीच्या पावसावर शेतकऱ्यांची मोठी भिस्त होती. मात्र, पावसाळा संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने रब्बी हंगामाचीही चिंता निर्माण झाली आहे. खरीप पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता रब्बी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता कशी होणार, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

दरम्यान, पावसाअभावी पुणतांबा येथील गोदावरी नदीपात्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली होती. मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर धरणांमधून गोदावरी नदीपात्रात सुमारे साडेचार हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदीवरील वसंत बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.

२३१ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेला वसंत बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्याने सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. तसेच परिसरातील काही गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासही या पाणीसाठ्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे पावसाने ओढ दिली असली तरी गोदावरीच्या विसर्गामुळे वसंत बंधारा भरल्याने नदीकाठावरील गावांसह शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!