
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी – श्रीरंग गोऱ्हे
पुणतांबा – ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात, फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण आणि विविध आकर्षक देखावे सादर करीत पुणतांबा येथे सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीत लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. या मिरवणुकीत दहा सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला. मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यंदा बारा दिवस मुक्काम केलेल्या गणरायाला निरोप देण्यासाठी सायंकाळी सहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक मुख्य रस्त्यावर आल्यानंतर गणेश भक्तांसह महिला वर्गाने रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. शिवाजी, हनुमान, महारुद्र, राष्ट्रसेवा दल, मित्र विहार, एकता, अचानक, जय दुर्गा, संत गोरोबा आणि जय श्रीराम या सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.
प्रत्येक गणेश मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत आकर्षक व पौराणिक देखाव्यांसह स्त्रीशक्तीचा जागर करणारे देखावे सादर करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण यामुळे मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. काही गणेश मंडळांनी दुपारीच गणेशमूर्तीची मिरवणूक काढून विसर्जन केले.
मुख्य चौकात प्रत्येक गणेश मंडळाचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. सुमारे सहा तास चाललेल्या मिरवणुकीनंतर शेवटच्या मंडळाच्या गणेशमूर्तीचे भक्तिभावाने गोदावरी नदीत विसर्जन करण्यात आले. चांगदेवनगर येथेही गणेश मंडळांच्या वतीने मिरवणूक काढून श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉ. धनंजय धनवटे व शेतकरी सेनेचे धनंजय जाधव यांनी लक्ष ठेवले. पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासन व गणेश मंडळांच्या सहकार्यामुळे विसर्जन मिरवणुका उत्साहात व शांततेत संपन्न झाल्या.




