
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक प्रश्नाविरोधात केवळ जनजागृती न करता ग्रामपातळीवर प्रतिबंधात्मक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर जिल्हा परिषद आणि स्नेहालय संचलित उडान – बालविवाह मुक्ती मिशन यांच्या समन्वयातून जिल्ह्यात व्यापक उपक्रम सुरू असून, या प्रयत्नांना आता प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवरूनही महत्त्वपूर्ण पाठबळ मिळत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून स्नेहालय उडान प्रकल्पाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या बालविवाह प्रतिबंधक जनजागृतीपर व्हिडिओचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
गणेशोत्सवानिमित्त स्वामी विवेकानंद तरुण मंडळ येथे आयोजित कार्यक्रमात आनंद भंडारी यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी त्यांनी स्नेहालय उडान प्रकल्प आणि स्वामी विवेकानंद तरुण मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात आलेला बालविवाहावरील जिवंत देखावा पाहिला. बालविवाहामागील सामाजिक व कौटुंबिक कारणे, त्याचे बालकांच्या आयुष्यावर होणारे परिणाम, कायद्याच्या तरतुदी तसेच बालविवाह रोखण्यासाठी कुटुंब आणि समाजाची भूमिका यांचे प्रत्यक्ष प्रसंगांतून प्रभावी सादरीकरण या देखाव्यात करण्यात आले आहे. त्यामुळे हा देखावा केवळ मनोरंजनाचा भाग न राहता नागरिकांना विचार करायला लावणारा आणि बालविवाहाविरोधात कृतीची भूमिका घेण्याचा संदेश देणारा प्रभावी समाजप्रबोधनाचा उपक्रम ठरत आहे.
जिवंत देखाव्याचे कौतुक करताना आनंद भंडारी यांनी बालविवाह प्रतिबंधासाठी स्नेहालय उडान प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचे विशेष कौतुक केले. स्नेहालय उडान प्रकल्प जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाय आणि पुनर्वसन या माध्यमातून बालविवाहमुक्त अहिल्यानगरच्या दिशेने काम करत असल्याचे नमूद करत त्यांनी या कार्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य राहील, अशी भूमिका व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असताना अशा जिवंत देखाव्यांमधून सामाजिक प्रश्न प्रभावीपणे लोकांसमोर मांडले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या भारती विद्यापीठ, बालभवन, टाटा इन्स्टिट्यूट तुळजापूर चे विद्यार्थी विद्यार्थी सहभाग आहे.
दरम्यान, बालविवाहाविरोधातील जनजागृती केवळ शहरापुरती किंवा एखाद्या कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता ती गावागावातील ग्रामसभेपर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी पुढे आला. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या ग्रामसभांमध्ये बालविवाहमुक्त ग्रामपंचायत व बालविवाहमुक्त गाव करण्याबाबत जिल्ह्यातील १,३२७ ग्रामपंचायतींमध्ये ठराव करण्यात आले आहेत. या प्रक्रियेला दिशा देताना मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी विविध बैठका व आढावा बैठकींमध्ये बालविवाह प्रतिबंधाचा मुद्दा सातत्याने मांडत ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले आहे.
आता या पुढील टप्प्यात २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये स्नेहालय उडान प्रकल्पाचा बालविवाह प्रतिबंधक जनजागृतीपर व्हिडिओ दाखविण्याबाबत ग्रामपंचायतींना सूचना करण्यात येणार असल्याचे आनंद भंडारी यांनी सांगितले. ग्रामसभेच्या माध्यमातून गावातील नागरिक, पालक, युवक, महिला आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत हा संदेश थेट पोहोचणार असल्याने बालविवाहाबाबतची सामाजिक जाणीव अधिक व्यापक होण्यास मदत होईल. बालविवाहाची कारणे, त्याचे दुष्परिणाम, कायदेशीर बाबी आणि बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी काय भूमिका घ्यावी, याबाबत दृश्य माध्यमातून समजण्यास सोपी माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील बालविवाह प्रतिबंधाच्या कामाला त्यामुळे प्रशासनाचा सक्रिय सहभाग, ग्रामपंचायतींचे ठराव आणि सामाजिक संस्थेच्या प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाची सांगड घातली जात आहे. जिल्हा परिषदेकडून बैठकींच्या माध्यमातून सातत्याने मार्गदर्शन आणि ग्रामपातळीवरील सहभागाला प्रोत्साहन दिले जात असताना, स्नेहालय उडान प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्यक्ष गावांमध्ये जनजागृती, जोखमीतील बालकांची ओळख, प्रतिबंधात्मक हस्तक्षेप आणि आवश्यकतेनुसार पुनर्वसनाचे काम केले जात आहे. या समन्वयामुळे बालविवाहाचा प्रश्न केवळ कायद्याच्या चौकटीत न पाहता सामाजिक जबाबदारी आणि सामूहिक कृतीचा विषय म्हणून गावागावात नेण्याचा प्रयत्न होत आहे.
यावेळी स्नेहालय उडान प्रकल्पाच्या मानद संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर उपस्थित होत्या. त्यांनी बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस, शाळा, पालक, युवक आणि नागरिक यांचा समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले. बालविवाहमुक्त अहिल्यानगरचे ध्येय साध्य करण्यासाठी स्नेहालय उडान प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली.
या जनजागृतीपर व्हिडिओच्या निर्मितीसाठी स्नेहालय संस्थेचे विश्वस्त शशिकांत सातभाई आणि अर्चीता सातभाई यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. या देखाव्यात बालविवाहाचा प्रश्न प्रभावीपणे नागरिकांसमोर मांडता यावा आणि व्हिडिओच्या माध्यमातून गावागावात सहज समजणारा व कृतीला प्रेरणा देणारा संदेश पोहोचावा, या उद्देशाने त्याची निर्मिती करण्यात आली आहे.
गणेशोत्सवातील जिवंत देखाव्यापासून २ ऑक्टोबरच्या ग्रामसभेपर्यंत आणि ग्रामपंचायतींच्या ठरावांपासून प्रत्यक्ष प्रतिबंधात्मक कामापर्यंत बालविवाहाविरोधातील जनजागृतीची ही चळवळ अधिक व्यापक होत आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि स्नेहालय उडान प्रकल्प यांच्या समन्वयातून सुरू असलेल्या या प्रयत्नांना प्रशासनाचा पाठिंबा, ग्रामपंचायतींचा सहभाग आणि सामाजिक संस्थेची क्षेत्रीय ताकद मिळत असल्याने बालविवाहमुक्त अहिल्यानगरच्या दिशेने एकत्रितपणे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे.




