महाराष्ट्रस्नेहालय संस्था अहिल्यानगर

संक्रांतीच्या हळदी–कुंकवातून संवाद, संस्कार आणि सामाजिक जाणीव स्नेहालय ‘परीस बालभवन’चा प्रेरणादायी उपक्रम

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

अहिल्यानगर-भारतीय संस्कृतीत हळदी–कुंकवाला सौभाग्य, एकोपा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. महिलांना एकत्र आणून संवाद, सन्मान आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा हा सण केवळ धार्मिक नसून सामाजिक संदेश देणारा आहे. याच हळदी–कुंकवाच्या पवित्र औचित्याने स्नेहालय संचलित परीस बालभवन येथे पालक संवाद चर्चासत्र तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमासाठी सिताराम सारडा हायस्कूलचे शिक्षकवृंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच वन स्टॉप सेंटरच्या प्रमुख शबाना मॅडम आणि स्नेहालय उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या सोबत उडान प्रकल्पाच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रतिक्षा वाघ उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात केंद्र समन्वयक जयश्री रासने यांनी प्रस्तावनेतून केली. पाहुण्यांचे स्वागत सुनिता सोळस्कर मॅडम यांनी केले. यावेळी बालभवनातील मुलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत कार्यक्रमात विशेष रंगत आणली.

या निमित्ताने आयोजित पालक बैठकीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक–पालक–विद्यार्थी या त्रिकुटाचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. पालकांनी आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे, दैनंदिन सवयींकडे तसेच मोबाईल वापरावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे व शनिवारीही नियमित शाळेत उपस्थित राहावे, याबाबत पालकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.कार्यक्रमात शबाना मॅडम यांनी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून महिलांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय सुविधा, मदत व संरक्षण याविषयी सविस्तर माहिती दिली.

 

तसेच प्रवीण कदम सर यांनी उपस्थित सर्वांकडून “बालविवाह होऊ देणार नाही” अशी शपथ घेत समाजात बालविवाहविरोधी जनजागृती करण्याचा संकल्प करून घेतला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आरेफा शेख मॅडम यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्र समन्वयक जयश्री रासने, शिक्षक सुनिता सोळस्कर, आरेफा शेख, सहशिक्षक फरीन शेख तसेच आशा बी. शेख यांनी मोलाचे सहकार्य केले.स्नेहालय ‘परीस बालभवन’च्या माध्यमातून साजरा झालेला हा हळदी–कुंकू व पालक संवाद उपक्रम पालक, विद्यार्थी व महिलांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारा ठरला.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!