अहिल्यानगर जिल्हा

श्री साईबाबा महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी, मतदार यादीतील नावाची पडताळणी आणि मतदानाच्या अधिकाराबाबत मार्गदर्शन

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

शिर्डी – लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि नवमतदारांना निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने श्री साईबाबा महाविद्यालयात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी, मतदार यादीतील नावाची पडताळणी आणि मतदानाच्या अधिकाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर (भा. प्र. से.), उपकार्यकारी अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी भिमराज दराडे आणि श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. राहाता तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार बाळासाहेब मुळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, निवडणूक साक्षरता मंच आणि महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार बाळासाहेब मुळे, महसूल सहाय्यक संग्राम गोरे आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी श्रीकांत तिटकारे उपस्थित होते. महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात सकाळी ११ वाजता कार्यक्रमाची सुरुवात श्री साईबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्राचार्य डॉ. संतोष औताडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्र काळे यांनी प्रास्ताविक करून मान्यवरांचा परिचय करून दिला.

नायब तहसीलदार बाळासाहेब मुळे यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेची माहिती दिली. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी तसेच मतदारांच्या नोंदीमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीनेही अर्ज करता येतो, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मतदार नोंदणीसाठी नमुना क्रमांक ६, मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ आणि मतदार यादीतील तपशील दुरुस्ती अथवा निवासस्थान बदलासह संबंधित बाबींसाठी नमुना क्रमांक ८ यांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून मतदार यादीतील नावाची खातरजमा करण्याचे आवाहनही करण्यात आले.

प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार म्हणून नोंदणी होणे आणि मतदार यादी अचूक व अद्ययावत राहणे हे पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी महत्त्वाचे आहे. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदानाचा अधिकार आणि लोकशाहीतील स्वतःची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. युवकांनी पात्रतेनुसार मतदार नोंदणी करून निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करण्यावर भर दिला जातो. ‘मी नव्हे, तर तुम्ही’ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ब्रीदवाक्याशी सुसंगत असलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शैक्षणिक संस्था आणि महसूल प्रशासन यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेला हा उपक्रम मतदार जागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरला.या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्यक्रम अधिकारी प्रा. प्रभाकर गांडुळे, डॉ. बाळासाहेब औताडे, डॉ. मनोज कुचेकर, प्रा. दीपक निर्मळ, प्रा. रुपाली कोल्हे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!