(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
लोणी – ग्रामीण भागातील युवक-युवती आणि महिला बचत गटांना स्वयंरोजगाराची नवी संधी उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर येथे व्यावसायिक मसाले निर्मिती, प्रक्रिया व पॅकेजिंग या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासह ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला मदत होणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. उत्तमराव कदम आणि पायरेन्सचे सचिव तथा संचालक डॉ. निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशिक्षणामध्ये मसाले निर्मितीचे आधुनिक तंत्रज्ञान, कच्च्या मालाची निवड, स्वच्छता व प्रक्रिया, आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर, मसाल्यांचे पॅकेजिंग, स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी, ब्रँडनिर्मिती, विविध परवाने आणि शासकीय योजनांची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. तसेच प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मसाले निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील युवक-युवतींसह महिला बचत गटांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे अधिकाधिक इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी केले आहे.नावनोंदणी व अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर ७९७२५०२५२१ / ७०४०१२४०८० संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.