(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर – पंचगंगा साखर कारखान्याने दाखविल्याप्रमाणे धाडस राज्यातील तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारांनी दाखवावे, असे मत अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी व्यक्त केले आहे.
शेतकऱ्यांच्या ऊसाच्या वजनात काटे मारून तसेच रिकव्हरी कमी दाखवून गेल्या अनेक वर्षांपासून ऊस उत्पादकांची लूट केली जात असल्याचा आरोप शेळके यांनी केला. मागील वर्षी शेतकऱ्यांनी खासगी काट्यावर ऊसाचे वजन करून कारखान्याकडे पाठविले असता, एका ट्रॅक्टरमागे दोन ते अडीच टन वजनाचा फरक आढळून आला होता. याविरोधात शेतकरी संघटनेने आंदोलन करून ऊसाचे वजन संबंधित गावातील खासगी काट्यावर करण्याची मागणी केली होती.
चालू गळीत हंगामात काटे तपासण्यासाठी काही अधिकारी आणि संबंधित तालुक्यातील शेतकरी प्रतिनिधींचे पथक साखर आयुक्तांकडून नेमण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, सरकारमध्ये बहुतांश साखर कारखानदार आमदार, खासदार आणि मंत्री असल्याने या पथकात त्यांच्या मर्जीतील शेतकरी प्रतिनिधींची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊसाला योग्य भाव मिळावा यासाठी सातत्याने आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा या पथकात समावेश करावा, तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असे शेळके यांनी म्हटले आहे.
अन्यथा प्रत्येक साखर कारखान्याने ऊसाचे वजन करण्यासाठी खासगी काटे करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावर्षी राज्यात मोठ्या दुष्काळामुळे ऊस उत्पादन निम्म्याने घटले आहे. त्यामुळे साखर कारखानदारांनी एकजूट करून केंद्र सरकारकडे साखरेचा टेंडर भाव किमान ५५ रुपये किलो करण्याची मागणी करावी. हा दर मिळाल्यास शेतकऱ्यांना किमान ४५०० रुपये प्रतिटन ऊस दर देणे सहज शक्य होईल, असे आवाहन शेळके यांनी साखर कारखानदारांना केले आहे.
किमान उत्पादन खर्च भरून निघून दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे शिल्लक राहण्यासाठी कारखानदारांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने साखरेचा दर किमान ५५ रुपये किलो केल्याशिवाय साखर विकणार नाही, असे निवेदन साखर कारखानदारांनी केंद्र सरकारला द्यावे, अशी मागणीही विठ्ठलराव शेळके यांनी पत्रकाद्वारे केली आहे.