
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
श्रीरामपूर : शहरातील गंभीर गुन्हेगारी प्रकरणातील आरोपींविरोधात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. विजय मुन्ना जेधे ऊर्फ गोरख जेधे, मनोज संजय साबळे, सोनू ऊर्फ जयप्रकाश अशोक बेग आणि अंकुश रमेश जेधे यांच्यासह दोन विधीसंघर्षित बालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८/२०२५ मध्ये विविध कलमांन्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि संघटित स्वरूपातील कारवाया लक्षात घेऊन पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला होता.
नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांची मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातील कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता मोक्का कायद्यातील तरतुदींनुसार पुढे जाणार आहे.
मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्यांमध्ये विजय मुन्ना जेधे ऊर्फ गोरख जेधे (वय ३३), मनोज संजय साबळे, सोनू ऊर्फ जयप्रकाश अशोक बेग (वय ४१) आणि अंकुश रमेश जेधे यांचा समावेश आहे. याशिवाय दोन विधीसंघर्षित बालकांवरही संबंधित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपींविरोधात मोक्का कायद्याच्या तरतुदी लागू करण्यात आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक विशाल खैरे, पोलीस उपनिरीक्षक रोशन विजय निकम, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक उपनिरीक्षक पांडे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर करीत आहेत.



