
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर (राहाता) – – जिल्हा बँकेचा चेअरमन कोण होणार, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील आणि सर्वांच्या समन्वयाने निर्णय होईल, अशी स्पष्ट भूमिका माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत सध्या समन्वयाचा प्रयत्न सुरू असून, निवडणूक लादली गेल्यास पूर्ण ताकदीने आणि शेतकऱ्यांचे हित संरक्षित ठेवून निवडणूक लढवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राहता शहरात ३ ऑक्टोबर रोजी पत्रकारांशी जिल्हा बँक निवडणुकीबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते.
डॉ. विखे पाटील म्हणाले, “मी पहिल्यापासून एकाच मुद्द्यावर ठाम आहे की, आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी उद्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सांगितले की, हा व्यक्ती संचालक झाला पाहिजे, तर आमच्यासाठी विषय संपला. आमच्यासाठी मुख्यमंत्री हेच आमचे नेते आहेत आणि आमच्या नेत्याचा आदेश हा अंतिम राहतो.
मध्यंतरी दुर्दैवाने बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि काही लोक त्यापासून वंचित राहिले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. अर्ज भरण्याची प्रक्रिया झाल्यानंतर सर्वांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न आहे. शेवटी किती लोकांचे समाधान होते, हा प्रश्न आहे. आठशे लोकांनी अर्ज नेले असतील आणि दीडशे अर्ज आले असतील, तर पदे मर्यादित आहेत. १८ ते २० जागांमध्ये दीडशे लोकांचे समाधान होऊ शकणार नाही.
आज शेतकऱ्यांच्या हितासाठी, दुष्काळाच्या परिस्थितीत मी स्वतः पुढाकार घेऊन, स्वतःच्या विचारांच्या विरोधात लढलो. मी माझे व्यक्तिमत्त्व मागे ठेवून शेतकऱ्यांसाठी तिकडे गेलो. हा जर पायंडा आम्ही पाडू शकलो, तर सगळ्यांनीच समन्वय दाखवला पाहिजे. प्रत्येकाला संचालक व्हायचे आहे; मात्र प्रत्येकाला त्याचे काम काय आहे, हे माहिती पाहिजे. ही स्पर्धा कुठेतरी बंद झाली पाहिजे.”
जिल्हा बँकेच्या नेतृत्वाबाबत ते म्हणाले, “जिल्हा बँकेचा चेअरमन कोण होणार, हे मुख्यमंत्री सांगतील आणि सगळ्यांच्या समन्वयाने होणार. जिल्ह्याचे तीन वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे हे प्रमुख नेते आहेत. महायुतीच्या वतीने राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील तसेच महाविकास आघाडीच्या वतीने बाळासाहेब थोरात यांनी समन्वय केला, तर मला जास्त आनंद होईल आणि जिल्ह्यालाही चांगला संदेश जाईल.”
कार्यकर्त्यांच्या भूमिकेबाबत ते म्हणाले, “आम्ही फक्त राजकीय लोक नाही आहोत. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर टाकले गेले, असे काही नाही. कुठल्याही कार्यकर्त्याचा अपमान झालेला नाही. मी कुठल्याही कार्यकर्त्याला संगमनेरला जायला सांगितलेले नाही. मी गेलो आहे. माझ्या कार्यकर्त्याचा मान-सन्मान माझ्या पदापेक्षा मोठा आहे. मी कोणापुढेही वाकेन, पण माझ्या कार्यकर्त्याला वाकायला लावणार नाही.”
“कोणाचाही स्वाभिमान गहाण न ठेवता आणि अहंकारी न होता जिल्हा बँकेमध्ये सत्ता कोणाचीही होऊ दे, चेअरमन कोणीही होऊ दे. फक्त ही निवडणूक होऊ नये, त्यावर भाषण होऊ नये आणि दुष्काळी परिस्थितीत मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येण्याची आवश्यकता पडू नये. शेतकऱ्यांना सामंजस्याने न्याय मिळावा, ही भूमिका सगळ्यांची आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँक ही राजकारणाची जागा नसल्याचे सांगताना डॉ. विखे पाटील म्हणाले, “सहकार क्षेत्रातील माणसाकडे जिल्हा बँकेची धुरा असली पाहिजे. सहकार क्षेत्रातील लोक जिल्हा बँकेमध्ये संचालक झाले पाहिजेत. हा राजकीय आखाडा नाही. जिल्हा बँक ही राजकारणाची जागा नाही. जिल्हा बँक जर चुकून थकली, बुडाली तर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोण उत्तर देणार? हा दिवस शेतकरी सभासदांच्या सोसायट्यांवर येऊ नये, यासाठी ही निवडणूक आहे. ही निवडणूक आमच्या प्रतिष्ठेची नाही, तर शेतकरी हिताची निवडणूक आहे आणि ती आम्ही ताकदीने लढू.”
बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकीय संबंधांबाबत ते म्हणाले, “आमच्यात वैचारिक मतभेद असतील, तर एकमेकांचा खून केला पाहिजे का? त्यातून लोकांचे समाधान होणार आहे का? कुठे राजकारणामध्ये थांबले पाहिजे, हे आम्हीही ठरवलेले आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. शेतातील उभी पिके जळून चाललेली आहेत आणि पंचनामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत आम्ही एकमेकांवर आरोप करायचे, असे होऊ शकत नाही. ठराविक लोकांच्या मजेसाठी अख्खा जिल्हा वेठीस धरायचा, असे काही होणार नाही.”
संगमनेर विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत ते म्हणाले, “संगमनेर तालुक्याला दुष्काळमुक्त करण्याचा शब्द दिला होता. भोजापूरचा चारीचा प्रश्न मार्गी लावून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला. लोकांना दुष्काळातही निळवंडे धरणाचे पाणी मिळाले. राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर झाले पाहिजे. मी संगमनेरला जाऊन कोणाला पाडा, असे म्हटले नाही. जेव्हा आम्ही प्रचार केला, तेव्हा तुमच्यासाठी हे करेल, असे सांगितले आणि ते आम्ही केले. दिलेल्या शब्दावर मी जागलेलो आहे.”
“त्यांचा पराभव झाला म्हणून मला आनंद होतो का? असे अजिबात नाही. कोणाचा पराभव होऊन आनंद घेणे ही राक्षसी प्रवृत्ती आणि मानसिकता आहे. ती माझी संस्कृती नाही. माझा पराभव झाला तरी मला त्या गोष्टीचा दुःख नाही, मग त्यांचा पराभव होऊन मला कशाला आनंद व्हायला पाहिजे? आम्ही सुसंस्कृत लोक आहोत. एकमेकांचा सन्मान ठेवला गेला पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.
सेटलमेंटच्या मुद्द्यावर डॉ. विखे पाटील म्हणाले, “आमच्या वादामध्ये काही ठराविक चुली चालतात. त्या चुली बंद पडल्यामुळे हा सर्व वाद निर्माण झालेला आहे. मग आम्ही विचार केला की, सगळे सेटलमेंटमध्ये चालले आहेत, तर आपण झेंडा घेऊन का पळायचे? आपणही सेटलमेंट करून घेऊ.”
महायुतीचे आमदार म्हणून आमदार लहामटे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. ते वरिष्ठ नेते आहेत. खासदार निलेश लंके यांच्याविषयी मला काही बोलावे, असे वाटत नाही. ते योग्य राहणार नाही आणि मलाही त्यावर काही भाष्य करायचे नाही. मला असे वाटते की, हे सगळे मोठे नेते आहेत.
त्या सर्वांना आम्ही विनंती करू. त्या विनंतीला आजपर्यंत त्यांनी मान दिला आहे आणि यापुढेही देतील. मात्र, यदाकदाचित त्यांनी विनंतीला मान न देता निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली, तर त्या निवडणुकीला सामोरे जायला आम्ही तयार आहोत. यामध्ये कुठलीही शंका-कुशंका नाही.
आम्ही घाबरलो आहोत, सत्ता जाईल म्हणून हतबल झालो आहोत किंवा आमच्याकडे मतदारसंख्या नाही, हा गैरसमज लोकांनी डोक्यातून काढून टाकावा. शेतकऱ्यांच्या या दुष्काळी परिस्थितीत आमचे वाद-विवाद, भाषणे आणि चिखलफेक होऊ नये म्हणून हा सामंजस्याचा प्रयत्न आहे. मात्र, निवडणूक लादली गेल्यास पूर्ण ताकदीने आणि शेतकऱ्यांचे हित संरक्षित ठेवून निवडणूक लढवली जाईल, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.



