
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अकोले – अकोले तालुक्यातील एकदरे ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश ऊर्फ रामा भांगरे हे गेल्या सुमारे दोन वर्षांपासून गावात आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनुपस्थित असल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरपंचांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल असून राजूर पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सरपंचांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामपंचायतीचे नियमित कामकाज आणि विकासकामांवर परिणाम झाला आहे. ग्रामपंचायतीकडे १५व्या वित्त आयोगाचा सुमारे ८ लाख ४१ हजार रुपयांचा निधी उपलब्ध असून तो खर्चाविना असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पेसा निधीच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
दरम्यान, लॅपटॉप, झेरॉक्स मशीन, घरघंटी आदी वस्तू देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून योगेश ऊर्फ रामा भांगरे यांच्याविरुद्ध राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका प्रकरणात सुमारे ७९ हजार ६०० रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय आणखी नागरिकांची फसवणूक झाल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या तक्रारींची पोलिसांकडून पडताळणी सुरू असून, आणखी कोणी फसवणुकीचा बळी ठरले असल्यास त्यांनी राजूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सरपंचांच्या अनुपस्थितीमुळे गावातील विविध विकासकामे रखडल्याचा आरोप उपसरपंच लीला भांगरे यांनी केला आहे. ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास राजूर पोलिसांकडून सुरू असून सरपंच योगेश ऊर्फ रामा भांगरे यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे. फसवणुकीचे आरोप हे तक्रारी व पोलिसांत दाखल गुन्ह्यावर आधारित असून त्याबाबत अंतिम दोषसिद्धी झालेली नाही.



