अहिल्यानगर जिल्हाराहाता तालुका

लोकल ते ग्लोबल’चा संदेश देत विद्यार्थ्यांचा उद्योजकतेकडे प्रवास

‘टाकाऊपासून टिकाऊ’सह स्वदेशी वस्तू, पर्यावरण संवर्धन आणि आत्मनिर्भर भारताचा जागर

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

प्रतिनिधी-शंकर सोनवणे 

 

लोणी-‘लोकल ते ग्लोबल’ ‘टाकाऊपासून टिकाऊ’, ‘चला स्वदेशी वस्तूंचा वापर करूया’, पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्ती, पारंपरिक ऊर्जेचा वापर आणि ‘आरोग्यासाठी आयुर्वेदाकडे वळूया’ अशा विविध संदेशांची प्रभावी मांडणी करत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या ‘बिल्डिंग प्रवरा’ विद्यार्थी एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 

 विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यवसायाची जोड देणारा हा उपक्रम आत्मनिर्भर भारताच्या दिशेने विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरत आहे.

जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी येथे शुक्रवारपासून ‘बिल्डिंग प्रवरा’ विद्यार्थी एक्स्पो सुरू आहे. विद्यार्थ्यांसह पालक आणि परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी करत विविध स्टॉलला भेट दिली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल झाली.

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि कल्पकता मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास ते उत्कृष्ट उद्योजक होऊ शकतात, हे ‘बिल्डिंग प्रवरा’च्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत सिद्ध होत आहे. ग्रामीण भारतातून विकसित भारताकडे वाटचाल घडविणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून उद्योजकतेचे धडे मिळत आहेत.

विद्यार्थ्यांनी स्वतः व्यवसायाची निवड करून त्यासाठी स्टॉल उभारले आहेत. उत्पादनाची निर्मिती, किंमत ठरविणे, ग्राहकांशी संवाद, मार्केटिंग, सोशल मीडियाचा वापर, आकर्षक योजना आणि विक्री तंत्र यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळत आहे. व्यवसायातील संधी, संभाव्य धोके आणि उत्पादनातून मिळणारा नफा याचीही त्यांना प्रत्यक्ष जाणीव होत आहे.

 

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी नारळपाणी विक्री, दुग्ध व्यवसायातून तयार केलेले प्रक्रिया पदार्थ यांसह विविध उत्पादनांचे स्टॉल उभारले आहेत. हस्तकलेला व्यावसायिक दृष्टिकोन देत विविध आकर्षक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. विविध कंपन्यांची उत्पादने घेऊन त्यांची विक्री करण्याचे कौशल्यही विद्यार्थ्यांनी आत्मसात केले आहे.

 

आयुर्वेदाबाबत जनजागृती करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे, सौंदर्यप्रसाधने, साबण, उटणे आदींचे स्टॉल लक्ष वेधून घेत आहेत. पायरेन्स संचालित डॉ. विखे पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल व महाविद्यालयाच्या वतीने आयुर्वेदिक उपचारपद्धतीबाबत मोफत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

‘चला पर्यावरण जपूया’ हा संदेशही एक्स्पोमधून देण्यात आला आहे. सौरऊर्जेचा वापर, बॅटरीवर चालणारी वाहने, सौरऊर्जेवर चालणाऱ्या विविध उपकरणांचे प्रात्यक्षिक यामुळे पारंपरिक ऊर्जेला पर्याय म्हणून स्वच्छ ऊर्जेचा संदेश दिला जात आहे. प्लास्टिकमुक्ती आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीवरही भर देण्यात आला आहे.

 

अंध व मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक पणत्या, आकाशकंदील आणि विविध शोभेच्या वस्तू ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या वस्तूंना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

आजच्या काळात वाचन संस्कृती कमी होत असल्याचे चित्र असले तरी एक्स्पोमधील पुस्तक विक्री स्टॉलला मिळणारा प्रतिसाद आशादायी ठरत आहे. या स्टॉलवर एका दिवसात सुमारे ६० ते ७० हजार रुपयांची पुस्तकविक्री झाल्याने वाचनाची आवड आजही कायम असल्याचे दिसून आले.विद्यार्थ्यांनी साकार केलेल्या विविध फनी गेम्स आणि खेळातूनही विद्यार्थ्यांच्या बुद्धीला अनेक कौशल्याला चालना देण्यासाठी गेम्स येथे आहेत. महाराष्ट्राची खाद्य संस्कृती मोठी आहे याच खाद्य संस्कृतीची आणि दर्जेदार असे विविध खाद्यपदार्थ या ठिकाणी विद्यार्थ्यांनी खाऊ गल्ली मध्ये ठेवले आहेत वडापाव पासून तर थेट मशरूमचे विविध पदार्थ चाखण्याची संधी या एक्सपोमध्ये ग्राहकांसाठी आहे.

 

पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुसऱ्या दिवशी ‘बिल्डिंग प्रवरा’ला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या व्यवसायाचे नियोजन, मार्केटिंग, येणाऱ्या अडचणी आणि भविष्यातील विस्ताराबाबत त्यांनी माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या स्टॉलमधून खरेदी करत विविध खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतला. आत्मनिर्भर भारतासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे. शासनासोबतच प्रवरा संस्थाही आवश्यक ते सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

 

संजीवनी उद्योग समूहाचे विश्वस्त सुमित कोल्हे व सौ. निकिता कोल्हे यांनीही एक्स्पोला भेट देत प्रवरेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न महत्त्वपूर्ण असून, शिक्षणासाठी अहिल्यानगरचे नवे मॉडेल उभारण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. 

 

“विद्यार्थ्यांनी स्टॉल उभारणीपासून सोशल मीडियावरील मार्केटिंग, सहप्रयोजक मिळविणे आणि प्रत्यक्ष विक्रीपर्यंतची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. आपणही यशस्वी उद्योजक होऊ शकतो, हा आत्मविश्वास त्यांनी कृतीतून दाखवून दिला आहे. रविवारपर्यंत सुरू असलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवावा,” असे आवाहन डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी केले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!