
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी-शंकर सोनवणे
लोणी – राहाता तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धांना शनिवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. कै. श्री. नाथाजी पाटील म्हस्के शैक्षणिक संस्थेचे विद्या विकास पब्लिक स्कूल, बाभळेश्वर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आणि श्री. यशवंतराव चव्हाण विद्यालय, राजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
१४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या या स्पर्धा ३ व ४ ऑक्टोबर रोजी दोन दिवस रंगणार असून राहाता तालुक्यातील सुमारे ७० संघांचा सहभाग राहणार आहे. त्यामुळे बाभळेश्वर येथील क्रीडांगणावर खो-खोच्या थरारक सामन्यांची पर्वणी क्रीडाप्रेमींना अनुभवता येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन कै. श्री. नाथाजी पाटील म्हस्के शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब नाथाजी पाटील म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्या विकास पब्लिक स्कूलचे प्राचार्य राजेंद्र नालकर, नाथाजी पाटील म्हस्के ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य ज्ञानेश्वर कांदळकर,कांबळे सर, सय्यद सर, राजेंद्र गायकर, अश्विनी पारखे मॅडम यांच्यासह राहाता तालुक्यातील क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक, विद्यार्थी, शिक्षक व क्रीडा रसिक उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी विद्या विकास पब्लिक स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व राहाता तालुका क्रीडा समितीच्या मार्गदर्शनाखाली सुनील गागरे (अध्यक्ष), अनिल चिंधे (कार्याध्यक्ष), राष्ट्रीय पंच राजेंद्र कोहकडे आणि बबनराव सातकर यांनी स्पर्धेचे कामकाज पाहिले. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना देणाऱ्या या स्पर्धांमुळे बाभळेश्वर परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे.



